वन्यप्राण्यांसाठी बेंडशीळच्या शेतकऱ्याचा उपक्रम 

बदलापूर : बदलापूरजवळील बेंडशीळ येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आदिवासींच्या मदतीने जवळच्याच जंगलात वन्यप्राण्यांना फळांची उपलब्धता व्हावी आणि येथील वन्यप्राण्यांची वर्दळ पुन्हा वाढावी या उद्देशातून २ हजार फळझाडांची लागवड केली आहे. तसेच या वातावरणात तग धरू शकणाऱ्या तब्बल दहा हजार फळबिया रुजवल्या आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील अंबरनाथ तालुक्यात मोठी वनसंपदा टिकून आहे. यात सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगेतील चंदेरी आणि टाहुली या रांगांमधील जंगल दिवसेंदिवस नष्ट होत आहे. येथील पठारी भाग उजाड होत आहे. त्यामुळे येथील प्राणिसंपदा गेल्या काही वर्षांत लोप पावत आहे. घनदाट जंगल आणि त्यात फळझाडांची संख्या मुबलक नाही. त्यामुळे या जंगलात प्राणी येण्याचे प्रमाण नगण्य आहे. या जंगलात प्राण्यांचा पुन्हा वावर वाढावा या उद्देशातून बदलापूरजवळील बेंडशीळ येथील चिकण्याची वाडी येथे अनुभव मांजरेकर या शेतकऱ्याने जंगलात फळझाडांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक आदिवासींच्या मदतीने टाळेबंदीत अनुभव यांनी फळबिया जमवल्या आणि त्यांचे रोप तयार केले. यासाठी प्रचंड मनुष्यबळ आवश्यक असतानाही मोजक्या आदिवासी तरुणांना सोबत घेत त्यांनी २ हजार फळझाडांच्या रोपांची लागवड या डोंगरावर केली. यात प्रामुख्याने आंबा, काजू, चिंच, आवळा या फळझाडांचा समावेश आहे. त्यासोबतच ताम्हण, बहावा या झाडांचाही यात समावेश आहे. तर निसर्गाच्या मदतीने आपोआप तग धरणाऱ्या विविध प्रकारच्या १० हजार बियाही या वेळी रुजवण्यात आल्या आहेत.  पुढील १२ वर्षांसाठी हा प्रयोग या ठिकाणी केला जाणार असून त्यातून देशी, त्यातही फळझाडांची लागवड करून वन्यसाखळी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली. या लागवडीमुळे भविष्यात जंगलातील प्राणी, पक्षी आणि स्थानिक आदिवासींना चांगले अन्न मिळू शकेल, तसेच जमिनीची धूपही रोखली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकरी

गेल्या वर्षांत अनुभव मांजरेकर यांनी अंबरनाथ तालुक्यात स्ट्रॉबेरी फळाची यशस्वी शेती केली होती. आद्र्र वातावरणात, त्यातही अंबरनाथसारख्या तालुक्यात केलेला हा पहिला प्रयोग होता. तो यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आता कमी अंतरावर आंब्याची लागवड करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. हा यशस्वी झाल्यास त्याचा इतर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.