बदलापूरच्या काका गोळे फाऊंडेशनमुळे ११० रुग्णांना दिलासा

बदलापूर : करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी लाभदायक ठरू लागलेल्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे गंभीर गुंतागुंत सोपी होऊ  लागली आहे. बदलापुरातील काका गोळे फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून प्लाझ्मा दान मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेला मोठे यश मिळत असून आतापर्यंतच ११० गंभीर रुग्णांना या मोहिमेतून प्लाझ्मा उपलब्ध झाला आहे. तर दररोज करोनातून बरे झालेले अनेक दातेही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येऊ  लागले आहेत.

रक्तदान चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या बदलापूर शहरातल्या काका गोळे फाऊंडेशनच्या माध्यमातून टाळेबंदीच्या काळात साखळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आहे. हेच करत असताना प्लाझ्माचे करोनाच्या गंभीर आजारातील रुग्णांच्या उपचारातील महत्त्व फाऊंडेशनने ओळखले. त्यानंतर कल्याण येथील अर्पण रक्तपेढी आणि मुंबईच्या केईएम रुग्णालयातील रक्तपेढीच्या सहकार्याने प्लाझ्मा दान मोहीम हाती घेण्यात आली. स्थानिक स्वयंसेवक धनंजय दीक्षित आणि कुणाल भोईर या दोन तरुणांनी या मोहिमेत स्वत:ला वाहून घेतले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत बदलापूर शहरात जनजागृती केली जाते आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांशी फाऊंडेशनच्या वतीने संपर्क साधून प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्यातून अनेक दाते पुढे येऊ  लागले आहेत. काका गोळे फाऊंडेशनच्या प्रयोगशाळेत इच्छुकांचे नमुने तपासून त्यांना त्यानुसार प्लाझ्मा दान करण्यासाठी नेले जाते. फाऊंडेशनच्या विशेष सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत दात्यांना रक्तपेढीत नेण्या-आणण्याची व्यवस्था केली जाते. एका दात्याच्या प्लाझ्मातून दोन रुग्णांना एकाच वेळी लाभ मिळतो. बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, वसई ते थेट पुण्यापर्यंतच्या ११० करोना रुग्णांना या चळवळीतून प्लाझ्मा मिळाल्याची माहिती फाऊंडेशनचे प्रमुख आशीष गोळे यांनी दिली. गेल्या महिनाभरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत या मोहिमेला चांगले यश मिळत असून दात्यांचा प्रतिसादही वाढतो आहे. बदलापूर शहरातून महिनाभरात ३५ दाते प्लाझ्मा दानासाठी पुढे आले असून त्यापैकी १६ जणांनी प्लाझ्मा दानही केले आहे.

रक्तदानानंतरच लस

काका गोळे फाऊंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या प्रत्येक महिन्यातल्या साखळी रक्तदान शिबिराला सहा महिन्यांत उदंड प्रतिसाद मिळाला आहे. मात्र १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार असल्याने त्याचा परिणाम रक्तदानावर होऊ  शकतो. त्यामुळे लस घेऊ  इच्छिणाऱ्यांनी आधी रक्तदान केल्यास त्याचा रुग्णांना फायदा होईल. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन काका गोळे फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.