जादा पैसे आकारून पोळी भाजी केंद्रांवर ग्राहकांची लूट

ठाणे : राज्यभर लागू झालेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत अजूनही अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. प्लास्टिकबंदीनंतर खाद्यपदार्थाची विक्री करताना अडचणी येऊ लागल्यानंतर अनेक पोळीभाजी केंद्रांवर प्लास्टिक पिशव्या दिसू लागल्या असून या पिशव्यांत खाद्यपदार्थ देण्याच्या मोबदल्यात ग्राहकांकडून जादा पैसे वसूल करण्यात येत असल्याचेही दिसून येत आह.

प्लास्टिकबंदी लागू होण्यापूर्वी पोळी भाजी केंद्रांवर प्लास्टिकच्या पिशव्यातून पोळ्या, भाजी, डाळ, भात दिला जात होता. शासनाने प्लास्टिकबंदी जाहीर केल्यानंतर विक्रेत्यांना तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. या अवधीत दुकानदारांकडे साठा असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याची मुभा देण्यात आली होती. सध्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरूझाल्यावर प्लास्टिकला पर्याय नसल्याने अनेकांना या निर्णयामुळे तोटा सहन करावा लागत आहे. विक्रेत्यांना प्लास्टिक वापरण्याचा अवधी संपल्यावर काही दिवस शहरात ठिकठिकाणी महापालिकेतर्फे छापे टाकून प्लास्टिक जप्त केले होते. या कारवाईला घाबरून नागरिकांबरोबरच शहरातील खाद्यपदार्थ विक्रेते डब्यातून जिन्नस विकत होते. मात्र गेल्या आठवडय़ापासून महापालिकेच्या या कारवाईची तमा न बाळगता ठाणे शहरातील नौपाडा परिसरातील पोळी भाजी केंद्रात खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे.

डोंबिवली, कल्याण शहरांतही फेरीवाले प्लास्टिक पिशवीतून विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यासमोर बसूनच हे फेरीवाले प्लास्टिक पिशवीतून लिंबू, भाजी, फळे, गजरे अशा वस्तू विकत असतात, असे या परिसरात जागरूक नागरिक ऋतुजा जोशी यांनी सांगितले. कल्याण येथील शिवाजी चौक, बैलबाजार परिसरात काही दुकानांतदेखील प्लास्टिक पिशव्यांचा छुप्या पद्धतीने वापर केला जात आहे.

ग्राहकांकडून वसुली

प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची तीव्रता कमी झाल्यावर तोटय़ात जात असलेला व्यवसाय सुरळीत करण्यासाठी काही दिवसांपासून बहुतेक दुकानदारांकडून प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यात येत आहेत. कारवाईची भीती असलेले काही विक्रेते प्लास्टिक पिशव्यातून खाद्यपदार्थ विकताना ग्राहकांकडून तीन ते पाच रुपये अतिरिक्त वसूल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शासन निर्णयानुसार दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यास सक्त मनाई आहे. शहरात अशा प्रकारे प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा सुरू झाला असल्यास महापालिका प्रशासन दुकानदारांवर कडक कारवाई करेल.

– मनीषा प्रधान, प्रदूषण-नियंत्रण अधिकारी, ठाणे महानगरपालिका