मीरा-भाईंदरमध्ये ३२५ किलो प्लास्टिक जप्त

प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबवण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून थंडावलेली मीरा-भाईंदरमधील प्लास्टिकबंदी मोहीम महापालिकेने पुन्हा सुरू केली आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी ३२५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महापालिका उपायुक्तांनी स्वत: छापे टाकून २५० किलो प्लास्टिक जप्त केले.

२३ मार्चला राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु २२ जूनला ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने प्लास्टिकवरील कारवाई तीव्र केली होती.

आयुक्त बालाजी खतगावकर यांनी यासाठी आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली १३ पथकांची स्थापना केली होती. महिनाभर या पथकाने धडक कारवाई करून मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक जप्त केले होते. मात्र जुलै महिन्यात ही कारवाई थंड पडली. त्यानंतर बाजारात पुन्हा प्लास्टिकने डोके वर काढायला सुरुवात केली. दुकानांमधून आणि भाजी बाजारात बेधडकपणे प्लास्टिक पिशव्या देण्यात येऊ लागल्या. त्यामुळे प्लास्टिक बंदी बारगळली की काय, असाच प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ लागला होता.

दोनच दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात बैठक आयोजित करून प्लास्टिक उत्पादक आणि व्यापारी यांच्यावर कडक कारवाई करून प्लास्टिकबंदीची मोहीम तीव्र करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गुरुवारपासून पुन्हा प्लास्टिक जप्तीला सुरुवात केली.

महापालिकेच्या विविध प्रभागात एकंदर ३२५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि व्यापाऱ्यांकडून १८ हजार ९०० रुपये  इतका दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे स्वत: या मोहिमेत सहभागी झाले होते. मीरा रोडमधील ‘मीरा प्लास्टिक’ या दुकानावर छापा टाकून त्यांनी तब्बल २५० किलो प्लास्टिक जप्त केले. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पानपट्टे यांनी स्पष्ट केले.