ठाणे शहरात ठिकठिकाणी संकलन वाहने तैनात करणार

राज्यभर प्लास्टिक बंदी लागू होण्यास दोन दिवस शिल्लक असताना ठाणे महापालिकेने प्लास्टिक आणि थर्माकोलच्या संकलनासाठी आता नागरिकांच्या दारात जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक व थर्माकोलच्या संकलनासाठी गावदेवी, नौपाडा, जांभळीनाका या भागांत महापालिकेची खास वाहने तैनात करण्यात येणार आहेत. या वाहनांमध्ये नागरिकांनी आपल्याकडील प्लास्टिक जमा करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

संपूर्ण प्लास्टिकबंदीसाठी दुकानदार, उद्योजकांना मुदतवाढ देण्यात आल्यानंतर आता २३ जूनपासून राज्यभर प्लास्टिक वापराचे र्निबध लागू होणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतरही ठाण्यात अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे आढळून आले आहे. पोळी-भाजी केंद्रे, किरकोळ विक्रेते यांच्याकडे अजूनही प्लास्टिक पिशव्यांमधून खाद्यपदार्थ, सामान दिले जात आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने आता पुढील दोन दिवस प्लास्टिक व थर्माकोल संकलनासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.   शहरातील बाजारपेठ असणाऱ्या नौपाडा, गावदेवी आणि जांभळीनाका या भागात पालिकेतर्फे प्लास्टिक संकलनासाठी वाहने उभी करण्यात येणार आहेत. यामध्ये थर्माकोल आणि प्लास्टिकचे संकलन केले जाईल. तसेच शहरातील निवासी संकुलांमधील प्लास्टिक गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे ८२९१७३५८९३ हा व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर स्वत:चे नाव, संकुलाचे नाव आणि पत्ता देण्यात यावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.

जमा होणारे प्लास्टिक आणि थर्माकोलचे संकलन करून त्याचे विघटन करण्यात येणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मनीषा प्रधान यांनी सांगितले. ठाणे पूर्व येथे असणाऱ्या सुका कचरा विघटन केंद्राकडे प्लास्टिकचा कचरा पाठवला जाणार असून थर्माकोल विघटनासाठी ठाणे पश्चिम येथील वागळे इस्टेट परिसरातील थर्माकोल विघटन केंद्राचा वापर करण्यात येणार आहे. मॉलमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक संकलनासाठी येथील अस्थापनांनी महापालिकेच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.