19 January 2021

News Flash

‘प्लास्टिकबंदी’ने फुले कोमेजली!

वसईतील फूल बागायतदारांना मोठा फटका

वसईतील फूल बागायतदारांना मोठा फटका; पॅकिंग करण्यासाठी पर्याय नाही

प्लास्टिकबंदी स्वागतार्ह असली तरी वसईतील फूल बागायतदारांना या बंदीचा मोठा फटका बसत आहे. वसईतून उत्पादन होणारी फुले प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करून मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी नेली जातात. कागदी पिशव्या ओल्या होऊन फाटतात, त्यामुळे प्लास्टिकनेच पॅकिंग करावी लागत आहे. प्लास्टिकला अद्याप पर्याय मिळाला नसल्याने फूल बागायदारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. वसईतील फूल बागायतदारांना फुलांचे पॅकिंग प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येच करावी लागते. पण या पिशव्यांना अजूनही सक्षम पर्याय मिळालेला नाही. वसई तालुक्यात पाच हजारांहून अधिक शेतकरी फुलांची शेती करतात. वसईतून दररोज चाफा आणि जास्वंदाचे १५ लाख नगांच्या आसपास उत्पादन होते. ही फुले दादरच्या फुलबाजारात नेली जातात. त्याचप्रमाणे मोगरा, जुई, सायली, तगर ही फुले प्लास्टिकच्या पिशवीत बांधली जातात.

वसईतून दररोज मुंबईत शेकडो किलो फुले विक्रीसाठी पाठवली जातात. या फुलांचे पॅकिंग प्लास्टिकच्या जाड पिशवीत केले जाते. नगावर विकली जाणारी फुले म्हणजे शेकडय़ाच्या हिशेबाने असलेल्या फुलांचे पॅकिंग कशे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चाफा आणि जास्वंद ही देवाला वाहणारी फुले आहेत. फुलांचे पॅकिंग करण्यासाठी कागदी पिशव्यांचा उपयोग होणार नाही, असे अर्नाळा येथील फूल बागायतदार किरण पाटील यांनी सांगितले.

ही फुले नाशवंत असतात. ही सर्व फुले सकाळी काढल्यानंतर संध्याकाळी कोमेजून जातात. सकाळी दव पडत असल्याने फुले ओली असतात, तसेच दिवसभर फुले टवटवीत राहण्यासाठी फुलांवर पाणी शिंपडावे लागते. यामुळे कागदी पिशव्या फाटून जातात, असे पाटील यांनी सांगितले. याशिवाय पावसाळ्यात तर कागदी पिशव्या वापरणे शक्यच नसल्याचेही ते म्हणाले.

कापडी पिशव्या अशक्य

वसई-विरारमधून मोगऱ्याचे सर्वाधिक उत्पादन होते. दररोज १ हजार किलो मोगरा मुंबईत जातो. मोगरा किलोवर विकला जात असल्याने तो कापडी पिशवीत नेला जाऊ  शकतो, परंतु चाफा, जास्वंद आदी नगावर विकला जात असल्याने तो कापडी पिशवीत शक्य नसल्याचे वासुदेव पाटील या शेतकऱ्याने सांगितले. कागदी पिशव्या ओल्या होतात. त्यात शंभर नग भरले तर वजन वाढेल आणि फुले खराब होतील, असे ते म्हणाले.

‘शासनाने पर्याय द्यावा!’

प्लास्टिकबंदी स्वागतार्ह असली तरी शासनाने पर्याय द्यावा, असे वसईतील फूल बागायतदार शेतकऱ्यांनी सांगितले. कचरा भरण्यासाठीची पिशवी (डस्टबिन बॅग), रोपांची पिशवी आदींना शासनाने या बंदीतून सवलत दिली आहे. त्याप्रमाणे फूल बागायतदारांसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांना सवलत द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 1:44 am

Web Title: plastic ban in maharashtra 22
Next Stories
1 बडय़ा गृहसंकुलांना कचरा प्रक्रिया बंधनकारक
2 मीरा रोडच्या शवागाराचे स्थलांतर
3 सामवेदी आयतन शैली
Just Now!
X