जीवितहानी नाही, दीड कोटींची मालमत्ता खाक
वसई पूर्वेच्या औदयोगिक वसाहतीत गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत तीन प्लास्टिक कंपन्या जळून खाक झाल्या. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी दीड कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
व्हिक्टोरी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील प्लास्टिक बनविणाऱ्या कंपनीला गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. गाळा क्रमांक ५ व ६ या कारखान्याला आगीने वेढले. प्लास्टिक असल्याने आगीने त्वरित पेट घेतला आणि बाजूला असणाऱ्या श्रीजी व पूर्णिमा प्लास्टिक या दोन कंपन्यांनात आग पसरली. आगीची माहिती मिळताच वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळविले. आगीची माहिती मिळताच आयुक्त सतीश लोखंडे, अग्निशमन दल प्रमुख भरत गुप्ता हे चक्क मोटारसायकलीवर घटनास्थळी पोहोचले.
ज्या ठिकाणी आग लागली, त्या परिसराच्या आजूबाजूला नेलपॉलीेश आणि कपडे बनविणाऱ्या कंपन्या होत्या. आग पसरू नये म्हणून तो परिसर तात्काळ निर्मनुष्य करण्यात आला. विभागीेय पोलीस उपअधिक्षक नरसिंह भोसले यांनी तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचे टँकर रातोरात घटनास्थळी उपलब्ध करून दिले. अडीच तासांच्या परिश्रमानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली.