वसई-विरार महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तीन वर्षांतच घरघर

वसईच्या अंबाडी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाची अवघ्या तीन वर्षांत दुरवस्था झालेली आहे. चौकातील डॉ. आंबेडकर स्मारकाची पडझड झाली असून साफसफाई केली जात नसल्याचे चित्र आहे. वसई-विरार महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अवघ्या अवघ्या तीन वर्षांतच स्मारकाला घरघर लागली आहे.

बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महत्त्वप्रू्ण बैठका घेतल्या होत्या, त्यापैकी एक बैठक वसईतील कामण येथे झाली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक वसईत उभारावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. महापालिकेने पुतळा उभारण्यास नकार दिला होता. मात्र २०१५मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने अंबाडी रोड येथील पंचवटी नाक्यावर स्मारक उभारले. पुस्तक आणि पेनाची प्रतिकृती साकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेला चौक उभारण्यात आला होता. मात्र अवघ्या तीन वर्षांतच त्याची वाईट अवस्था झालेली आहे.

अंबाडी पुलावर जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. सतत धूळ उडत असल्याने चौक धुळीने माखलेला आहे. स्मारकावर छत नसल्याने पक्ष्यांनी घाण केलेली आहे. स्मारकाचा रंग उडाला असून त्यावरील दिवेही बंद झालेले आहेत. स्मारकाचे बांधकाम मुळात निकृष्ट होते, त्याला आता जागोजागी तडे पडलेले आहेत. त्यामुळे ते कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून या स्मारकाची कुठल्याच प्रकारची देखभाल करण्यात येत नाही. त्यामुळे तीन वर्षांचे स्मारक आता पुरातन वाटू लागले आहे. या चौकातील स्मारकाची अत्यंत वाईट अवस्था झाली असून महापालिकेने त्वरित दुरुस्ती करून स्मारकाचा योग्य सन्मान राखायला हवा, अशी मागणी सिद्धार्थ जागृती संघाचे अतुल मोटघरे यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक महापालिकेने बांधलेला आहे. त्याची निगा आणि मान राखणे हे महापालिकेचे काम आहे. प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल.

– रूपेश जाधव, महापौर, वसई-विरार महापालिका