धावपळीच्या युगात एकूणच वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड होत असली तरी सोशल मीडियावरील संदेशांच्या देवाणघेवाणींद्वारे सध्या कवितांना बरे दिवस आल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळे सुविचार आणि थोरामोठय़ांच्या प्रेरणादायी उद्गारांबरोबरच बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज आदींच्या अभिजात काव्य रचनाही एकमेकांना शेअर होताना दिसताहेत. एकीकडे साहित्य, संस्कृती क्षेत्रातील व्याख्यानमाला या प्रकाराला उतरती कळा आली असली तरी कवी संमेलनांचा बहर कायम आहे. साठोत्तरी मराठी साहित्यात मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयींनी मराठी कविता लोकाभिमुख करण्यात मोठाच हातभार लावला. तीच परंपरा अशोक नायगांवकर, रामदास फुटाणे, संभाजी भगत आदींनी पुढे ठेवली. नव्या पिढीतील कवितांना एकत्र आणण्यात तसेच जुन्या प्रतिभावंतांसोबत त्यांचे एकत्रित कार्यक्रम घडवून आणण्यात कवी अरुण म्हात्रे यांचे योगदान मोठे आहे. मंचावरून आपली रचना सादर करण्यास प्रत्येकालाच स्वारस्य असते. मात्र स्वत: अतिशय प्रतिभावंत कवी असूनही अरुण म्हात्रे तो मोह दूर ठेवून महाराष्ट्रभरातील नवोदितांच्या व जुन्यांच्याही अस्सल रचना रसिकांसमोर पेश करीत आहेत. त्यामुळे एका अर्थाने मराठी कवितेचे ते ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. अलीकडेच घाटकोपर येथे मुंबई मराठी साहित्य संघ आणि झुनझुनवाला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या १२व्या महाविद्यालयीन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद..
*संमेलनाच्या निमित्ताने आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, या वेळी या विद्यार्थ्यांचा कवितेबद्दलचा दृष्टिकोन कसा वाटला, त्यांना कविता प्रकार भावतोय का ?
*वडीलधारी माणसे ग्रेटच सारखी म्हणतात, आम्ही खूप पावसाळे पाहिले. आयला, इथे एक पावसाळा जाताना मारामार.वडीलधाऱ्या लोकांना काय सांगणार आम्हाला कुठे-कुठे आणि कसे-कसे भिजावे लागते ते..’
माझ्या ‘कॉलेजचे तुकडे’ या कवितेच्या या ओळी म्हणताच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जोरदार दाद दिली. ही कविता त्यांच्या भावविश्वाशी निगडित असल्याने ही दाद मिळाली. कारण या महाविद्यालयीन मुलांना प्रेम कविता आवडते. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र या तरुणांना चारोळी, क्षणिका असे कवितेचे छोटे प्रकार विशेष आवडतात. मात्र या चारोळ्या म्हणजेच खरी कविता समजण्याचा धोका या विद्यार्थ्यांकडून असतो. कारण कवितेच्या बाबतीत एक सार्वकालिक अडचण आहे. ती म्हणजे कविता म्हणजे नेमके काय, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम दिसून येतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नेमके असेच आहे. त्यांना छोटेखानी, चमकदार कल्पना, एखादा तरल संवाद, आर्त स्वर फार चटकन भावतो. त्यामुळे गझल, शेरो-शायरी, रूबाया, चारोळ्या हा विद्यार्थ्यांच्या रुचीचा भाग असतो. गंभीर कवितेकडे त्यांचा कल नसतो आणि याला कारण म्हणजे या मुलांचे वाचन झालेले नसते. त्यामुळे मोठय़ा साहित्यिक-कवींच्या नावाचा त्यांच्याशी परिचय झाला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बऱ्याचदा कविता हा प्रकार पहिल्यांदाच ऐकल्याचा भाव काहींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला आहे. त्यामुळे अशा मुलांवर कवितेचा पहिला संस्कार करावा लागतो. तरीही महाविद्यालयातील युथ फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन, नाटक आदींमध्ये सहभागी असणाऱ्या वाचन व कवितेकडे ओढा अधिक असतो. यामागे या विद्यार्थ्यांवर कष्ट करणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. त्यामुळे कविता माहीत असलेले व माहीत नसलेले असे आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे दोन प्रकार दिसून येतात.
* समाज माध्यमांमुळे अभिजात कवितांना चांगले दिवस आलेत असे आपणास वाटते का?
समाज माध्यमांवरील बहुतेक कविता या नवोदितांच्या असतात. त्या कविता आशयघन असतीलच असे नाही. मर्ढेकर, बालकवींच्या कवितांमध्ये सापडणारा आशय आता दिसून येत नाही. इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर, गुरू ठाकूर आदींच्या कविता अधून-मधून समाज माध्यमांवर झळकून जातात. तसेच ज्या कविता येतात, त्यांचा जगण्याशी संदर्भ असतो. त्यामुळे त्यांचे आदान-प्रदान अधिक होते. मातृदिनी आईवरील कविता, प्रवास करताना त्याबाबतच्या कविता, म्हणजेच औचित्य व जगण्याच्या संदर्भाना धरून या कविता समाज माध्यमांमध्ये पसरतात. पण यात अभिजात कवितांना समाज माध्यमांमध्ये चांगले स्थान दिसून येत नाही. पण एखादी कविता समाज माध्यमांमध्ये प्रसारित होतेय हा कविता प्रसाराच्या बाबतीतला आशेचा किरणच मानावा लागेल. आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगात समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांना सगळ्यांशी संवाद साधूनही आपल्या एकटेपणाची जाणीव व्हायला लागली आहे. त्यामुळे या एकटेपणाकडून कवितेकडे जाणारेही अनेक जण आहेत. हल्लीच्या कथा, नाटक यांपेक्षाही कविता अनेकांना जवळची वाटते.
*विविध शहरात होणाऱ्या साहित्य संमेलनांमुळे वाचन संस्कृतीचा प्रसार होतोय, असे वाटते का?
साहित्य संमेलनांमुळे साहित्य प्रसारावर फरक पडतो, मात्र मराठी साहित्यात फार पहिल्यापासूनच एक घोळ झालेला आहे. मराठी साहित्य विश्वात सहभाग घेणारे अवघे वीस टक्केच असून इतर सत्तर ते ऐंशी टक्के समाजातील वेगवेगळ्या पाश्र्वभूमीशी निगडित घटक या साहित्य विश्वापासून दूर गेले आहेत. संमेलनांचा प्रभाव पडतोच. चांगले पुस्तक, चांगली कविता वाचकांपर्यंत पोचण्यासाठी अशा उपक्रमांची मदतच होते. संगणकीय शिक्षण घेऊन नोकरी करणारी तरुण मंडळी समाज माध्यमांवर कविता, साहित्याचे आदान-प्रदान करताना दिसतात. कारण ते संगणकाच्या जवळ असतात. मात्र संगणकीय क्षेत्र सोडून अन्य प्रांतांत काम करणारेही अनेक तरुण आहेत. मात्र ते साहित्य व कविता यांपासून लांब दिसतात. त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचायला हवे. अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर भौतिक सुविधांप्रमाणेच साहित्य हेही जगण्यासाठी आवश्यक आहे, याची जाणीव जास्तीत जास्त लोकांना होणे आवश्यक आहे.
*व्याख्यानमालांना गर्दी कमी होताना दिसते, या पाश्र्वभूमीवर कवितांच्या कार्यक्रमांना प्रतिसाद कसा मिळतो?
कवितेची परिस्थिती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमांपेक्षा नक्कीच चांगली आहे. हल्ली व्याख्यानमालांमधील प्रत्येक चेहरा परिचयाचा असतोच असे नाही. मात्र कवितांच्या कार्यक्रमातील चेहरा हा परिचयाचा असतो. हे कवी सादरीकरण करणारे कवी आहेत, मंचीय कवी आहेत. त्यामुळे कवितांच्या कार्यक्रमांना येणारे कवी हे व्याख्यानमालांमधील वक्त्यापेक्षा निश्चितच परिचयाचे असतात. पण या मंचीय कवींइतकीच चांगली कविता करणारे दा. सू. वैद्य, हेमंत जोगळेकर हे कवी माहीत नाहीत. यांच्याही कविता सुंदर आहेत. त्यामुळे सर्वच कवींना यापुढे आशयघन कविता टिकविण्यासाठी इथून पुढे सादरीकरणात यावे लागेल. आधुनिक जगातील समाज माध्यमांत यावे लागेल. कारण या माध्यमांमुळे या कवींचे व पर्यायाने त्यांच्या कवितेचे महत्त्व वाढेल. त्यामुळे व्याख्यानमालांपेक्षा कवितांना चांगले दिवस आहेतच.
*तुम्ही नेहमी अन्य कवींच्या कविता सादर करताना दिसता..
मी पोद्दार महाविद्यालयात असताना राम पटवर्धनांच्याकडे शिकलो. तेव्हापासूनच कवितेबाबतचे कठोर संस्कार माझ्यावर झाले होते. याच महाविद्यालयीन आयुष्यात मी कविता करू लागलो होतो. ऐंशीच्या दशकात प्रेम कवितांपासून माझा हा कवितेसोबतचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मी पु. शि. रेगे, आरती प्रभू, कवी ग्रेस, ना. धों. महानोर, सुरेश भट, म. म. देशपांडे तसेच विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, विठ्ठल वाघ, दया पवार, बा. भ. बोरकर, केशवसुत, कुसुमाग्रज, कवी अनिल अशा आमच्या काळातील दिग्गज कवींना त्यांच्या काव्यसंग्रहातून भेटलो. त्यांच्या पुस्तकांचा प्रभाव माझ्यावर पडला. त्यामुळे कवितेच्या प्रातांत लिखाणासाठी शिरताना या कवींच्या कविता वाचाव्या लागतीलच हे मला उमगले होते. लोकांना कवितेच्या विश्वात ओढून घेण्यासाठी मला या कवींच्या कविता साथ देतात. कार्यक्रम यातून रंगत जाताना एखादी शेवटची कविता येऊन जाते आणि जेव्हा कार्यक्रम संपतो तेव्हा लोक नेहमी विचारतात की म्हात्रे अहो, आत्ताच कार्यक्रम सुरू झाला होता. अशा वेळी माझी,
अंतिमत: दोन ओळीत
जागा होऊन बघ तू जगावेगळे
की शस्त्रक्रियेत येणार गुंगी
पाहून घे आप्त काचातले..
अशी एखादी कविता होते आणि कार्यक्रमाचा समारोप होतो.