संगीता अरबुने, कवयित्री

संगीता अरबुने या प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका आहे. त्यांचे ‘प्रतिबिंब’, ‘ओंजळीतलं चादंणं’, ‘स्वत:ला आरपार ओवताना’ हे कवितासंग्रह तसेच ‘चौकट’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्यांच्या कवितासंग्रहांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

माझे बालपण साताऱ्याच्या रहिमतपूर या छोटय़ाशा गावात गेले. आजी निरक्षर तर आजोबा दुसरी-तिसरी शिकलेले, त्यामुळे घरात तसे वाचनाचे वातावरण नव्हते. शाळेतील पाठय़पुस्तके आणि मिळालेली गोष्टीची पुस्तके त्यात गुलबकावली, जादूचा दिवा इत्यादी पुस्तके वाचली. जेव्हा अकरावी-बारावीचे शिक्षण घेत होते त्या वेळी आमच्या शेजारी एक गुजराती कुटुंब राहत होते अन् ते वाचनालयाचे सभासद होते. त्यांच्याकडील पुस्तके एकदा बहिणीने आणली आणि मग ती पुस्तके मीही वाचली. ती वाचताना वाचनाची गोडी लागली. त्यामध्ये गुलशन नंदा, योगिनी जोगळेकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर आणि चंद्रकांत काकोडकर यांची पुस्तके मी आवडीने वाचली. या पुस्तकांनी फारसे काही दिले असे नाही; परंतु वाचनाची गोडी लावून गेले. या कथा-कादंबऱ्यांतून एक वेगळे विश्व समोर आले. शहरी जीवन समजले. कल्पनाशक्तीचा मनावर प्रभाव पडतच गेला. त्या वेळी पुढे आपणही असे काही तरी लिहावे असे वाटत होते.

पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी साताऱ्याला आले. एकदा शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेसाठी गेले तर तेथे काव्यवाचनाचीदेखील स्पर्धा होती. त्या स्पर्धेतील स्पर्धकांचे सादरीकरण पाहून मी भारावूनच गेले. आपल्या वयाची मुले इतके छान लिहितात, सादरीकरण करतात. ते पाहून मलाही प्रेरणा मिळाली. त्या वयात मीही कविता लिहू लागले. त्या ध्यासातून माझ्याकडून प्रेमकविता किंवा व्यक्तिविशेष स्वरूपाच्या कविता लिहिल्या गेल्या.

२००१ मध्ये सहज एका काव्यस्पर्धेत भाग घेतला अन् त्या काव्यस्पर्धेने मला कवितेशी आणि साहित्य क्षेत्राशी जोडले. मी कविसंमेलनांना हजेरी लावू लागले. कवी-लेखकांमध्ये ऊठबस होऊ  लागली. त्याचा फायदा म्हणजे आपण नेमके काय वाचले पाहिजे, कविता कशी असली पाहिजे हे मला हळूहळू कळत गेले आणि तेथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मग पुष्कळ पुस्तकांची खरेदी केली, वाचनालय लावले. खूप वाचत गेले त्यातून लिहायलाही शिकले. अन् कविता लिहिता लिहिता कथा, लेख, परीक्षण हेदेखील लिहू लागले.

कथा, कादंबऱ्या, वैचारिक, तत्त्वचिंतनपर, समीक्षात्मक, आध्यात्मिक इत्यादी असे र्सवच प्रकारचे वाचन करायला मला आवडते. कधी असे होते की काहीच चांगले वाचता येत नाही किंवा काही आवडेनासेच होते. अशा वेळी मी ज्ञानेश्वरी वाचते. त्याने मनाला शांती लाभते. माझ्या वैचारिक आणि वाङ्मय स्तरावर प्रभाव टाकणारी बरीच पुस्तके आहेत त्यामध्ये अनंत सामंतांचे ‘एम. टी. आयवा मारू’, चिं. त्र्यं. खानोलकरांचे ‘रात्र काळी घागर काळी’, राजेंद्र गवस यांचे ‘भंडारभोग’, भालचंद्र नेमाडेंचे ‘हिंदू’, मेघना पेठेंचे ‘नातीचरामी’, शिवाजी सामंत यांचे ‘मृत्युंजय’ आणि कविता महाजनांचे ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ ही पुस्तके विशेष आहेत. त्याचबरोबर मला रवींद्र शोभणे, सतीश तांबे, मोनिका गजेंदड्रकर आणि राजन खान यांच्यादेखील कादंबऱ्या आवडतात. माझ्या आयुष्यावर खऱ्या अर्थाने प्रभाव टाकणारे पुस्तक म्हणजे रोंडा ब्रायन यांचे ‘द सिक्रेट’ हे आहे. या पुस्तकाने माझ्या विचारांना, विचार करण्याच्या पद्धतीला दिशा दिली. यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या पुस्तकामुळे मी जगण्याची एक वेगळीच ऊर्मी घेत, सकारात्मक ऊर्जेने जगायला आणि लिहायला लागले. पुस्तके वाचता वाचता आपण आपल्यालाच वाचायला शिकतो. यावरून आपण एक माणूस म्हणून कोठे आहोत, कुठल्या गंडाने पछाडलेले आहोत हे आपल्याला कळते. जगण्याला नकळत दिशा मिळते. जीवनाकडे बघण्याची एक प्रगल्भ दृष्टी प्राप्त होते ज्यामुळे जाणिवा प्रगल्भ होतात. पुस्तके माणसाचे जीवन समृद्ध करण्यास सहकार्य करतात. अर्थात, कुठल्या प्रकारची पुस्तके वाचता यावर ते अवलंबून असते.

शब्दांकन- सुहास बिऱ्हाडे