स्वरांजली भद्रे, कवयित्री, गीतकार

वयाच्या १६व्या वर्षी ‘कस्तुरी’ हा कवितासंग्रह प्रकाशित करून प्रसिद्धीझोतात आलेल्या स्वरांजली भद्रे या मराठी सिनेसृष्टीत गीतकार आणि पटकथाकार म्हणून स्थिरावत आहेत.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट

आम्ही मूळचे नांदेडचे. बाबांची बदली झाली आणि आमचं कुटुंब जव्हार या ठाणे जिल्ह्य़ातील अतिशय दुर्गम आदिवासी भागात स्थित झालं. त्या वेळी घरात टेलिव्हिजन किंवा तत्सम मनोरंजनाचं साधन नसल्याने अभ्यास हा एकमेव पर्याय उरत होता. त्यातच एकदा भाषणाचा मजकूर मिळवण्यासाठी जवळील राधाकृष्णन सार्वजनिक वाचनालयात जाण्याचा योग आला आणि वाचनाचा श्रीगणेशा झाला. बाबांनाही वाचनाची आवड होतीच. त्यामुळे प्रोत्साहन मिळत गेलं. वयाच्या ११व्या वर्षी वाचलेली अरुण हरकारे यांची ‘कर्ज’ कादंबरी हे आयुष्यातील पहिलं अवांतर वाचन. ‘ययाति’ आणि ‘मृत्युंजय’ तर सातवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतच वाचून पूर्ण केल्याच स्मरतं. ‘भगवतगीता’, ‘राडा’, ‘आनंदओवरी’, ‘अग्निपंख’, ‘बलूतं’, मॅक्झिम गॉर्कीची ‘आई’, ‘कोल्हाटय़ाचं पोर’, ‘रानवेडय़ाची शोधयात्रा’, ‘माझी जन्मठेप’, ‘वनवास’, ‘रीच डॅड पुअर डॅड’ ही त्याच वयात वाचलेल्या पुस्तकांपैकी काही जास्त भावलेली. दरम्यान, वर्तमानपत्रांतील लेख वाचून त्यावर स्वत:ची मतं मी लिहून ठेवू लागले. वेदादी शास्त्राचा अभ्यास चालू केला. जसे जसे संदर्भ जुळत गेले तशी तशी शास्त्रार्थाची गोडी अधिकाधिक वाढत गेली. आणि जुन्या पुस्तकांचा संग्रह करण्याची आवड जडली. ऋग्वेद आणि विष्णु पुराण हे त्यातल्या त्यात जास्त आवडले.

याच काळात एका काव्यलेखन स्पर्धेसाठी लिहिलेल्या कवितेसाठी पहिला क्रमांक मिळाल्याने उत्साह वाढला आणि वयाच्या १६व्या वर्षीच ‘कस्तुरी’ या पहिल्या काव्यसंग्रहाने जन्म घेतला. सानेगुरुजींच्या सर्वच पुस्तकांची मी ऋणी आहे. आयन रॅण्डच्या ‘अट्लास श्रग्ग्ड’, ‘वी द लिविंग’ आदी पुस्तकांनी मनावर विशेष संस्कार केले. एलेक्स हेलिचं ‘रूट्स’, हेमिंग्वेचं द ओल्ड मन अ‍ॅण्ड द सी, फ्रान्सिस दिब्रिटोचं ‘ओअँसीसच्या शोधात’, ‘तुकारामांची गाथा’, ‘मी अल्बेर्ट एलीस’, विवेकानंद लिखित ‘ज्ञान योग’, ‘कर्म योग’, ‘कोसला’, ‘हिंदू’, ‘मेलोडी’, ‘गीतांजली’ ही विशेष भावलेली पुस्तकं.

द. मा. मिरासदार, एलकुंचवार, अरुणा ढेरे, शांता शेळके, धारप, मतकरी, जी.ए., अरविंद गोखले, तेंडुलकर यांनी अद्भुत कथाविश्वची सफर घडवली. तर शन्ना, वपुंच्या सहज लेखनातून विविधांगी सामान्य माणूस उलगडत गेला. हेमिंग्वे, आयन रॅण्ड ,भालचंद्र नेमाडे, अल्बर कामू हे लेखक मला विशेष आवडले. नुकतंच मी डोस्तोवस्किचं ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. तर सध्या मारीओ पूज्झो यांचं ‘द गॉड फादर’ आणि प्लेटोचं ‘द रिपब्लिक’ हे पुस्तक मी  वाचायला घेतलं आहे.

सुरुवातीला मी मराठी पुस्तकं वाचत होते. आता इंग्रजी आणि बंगाली पुस्तकांकडे भर दिला आहे. महाश्वेतादेवींची अनुवादित कांदबरी वाचली. पण भाषेचा मूळ गोडवा अनुभवता यावा यासाठी मी बंगाली भाषाही शिकतेय. दुकानातून पुस्तकं खरेदी करण्यापेक्षा मी ऑनलाइन पुस्तकं विकत घेते, कारण त्यात वेगवेगळ्या पुस्तकांचा पर्याय असतो. माझ्या घरात हजारो पुस्तकांचा संग्रह झालाय. हीच माझी खरी संपत्ती. पुस्तकांचा मला कायमच मानसिक आधार वाटत आलाय. अगदी जवळच्या मित्रासारखा, प्रियकरासारखा, शिक्षकासारखा हा आधार वृद्धिंगत होत गेला. याच पुस्तकांना वाचता वाचता आता माणूसच वाचता येऊ  लागलाय आतल्या देठापासून.