News Flash

तरुणाईच्या अभिव्यक्तीला वाट देणारा कवितांचा ‘कॅफे’

साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी नेहमीच गजबजलेल्या ठाणे परिसरात साहित्यविषयक कट्टे नवीन नाहीत.

ठाण्यात ‘कॅफे वर्व’ येथे कवितांचा कट्टा भरू लागला आहे.

साहित्याची चळवळ वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम

साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी नेहमीच गजबजलेल्या ठाणे परिसरात साहित्यविषयक कट्टे नवीन नाहीत. शहरातील वेगवेगळय़ा भागांत वेगवेगळय़ा नावांनी सुरू असलेल्या या कट्टय़ांच्या माध्यमातून नवोदित लेखक, कवींना आपले शब्दाविष्कार सादर करण्याची संधी मिळते. तर, रसिकांनाही नवनवीन साहित्याची मेजवानी मिळते. याच धर्तीवर ठाण्यातील अनीश व्यवहारे या तरुणाने ‘पोएट्री टय़ूजडे’ हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमांतर्गत दर आठवडय़ाला वेगवेगळय़ा विषयांवर मुक्तपणे आपल्या कविता मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठाण्यातील तरुणांसाठी हमखास विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या तलावपाळीजवळील ‘कॅफे वर्व’ येथे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा कट्टा भरू लागला आहे. कवितांचा मंगळवार ही संकल्पनाच काहीशी आगळीवेगळी. थोडीशी पाश्चात्त्य संस्कृतीशी जवळीक साधणारी. त्यामुळे ‘पोएट्री टय़ुजडे’ हा काव्यकट्टा काव्यप्रेमींमध्ये आकर्षणाचा विषय ठरू लागला आहे. समाजमाध्यमाचा विधायक वापर करीत असंख्य नागरिकांना या उपक्रमासाठी अनीश व्यवहारे यांनी आमंत्रित केले. तरुणांमध्ये कवितेचा प्रसार, मनातील काव्याला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने २००९ साली ‘कोरम मॉल’ मधील ‘कॅफे कॉफी डे’ येथून सुरू झालेला हा उपक्रम आज त्यांचे पंचावन्न भाग पूर्ण करीत आहे.

धकाधकीच्या जीवनात मनातील असंख्य विचारांना एक दिशा देण्याचे काम ‘पोएट्री टय़ूजडे’च्या माध्यमातून होत असते. वयाची मर्यादा नाही, भाषेचे बंधनही नाही, कवितांचे परीक्षण नाही, शब्दांनाही आवर नाही.. केवळ भावनांना वाट मोकळी करून देत आत्मविश्वासाने कवितेचे सादरीकरण करायचे, असा या कट्टय़ावरचा अलिखित नियम आहे. बऱ्याचदा मनातील विचार कवितांच्या रूपात आकार घेत असतानाही केवळ आत्मविश्वासाच्या अभावाने ते व्यक्त करण्याचे अनेक जण टाळतात. अशा मंडळींसाठी हा कट्टा साहित्य क्षेत्रात ओळख निर्माण करण्यासोबतच आत्मविश्वास मिळवून देणारा उपक्रम ठरत आहे. हा केवळ एक उपक्रम न राहता विचारांचे परिवर्तन कवितेमध्ये करून एक प्रकारची कवितेची चळवळ उभी करण्याचा अभिनव प्रयत्नही येथे सुरू झाला आहे. यामध्ये दैनंदिन जीवनावर भाष्य करण्याऱ्या कविता, तसेच हवामानातील बदलांचे भाव टिपणाऱ्या कविता, एखाद्या घडलेल्या घटनेचा ऊहापोह करणारी कविता आदी असंख्य विषयांवर येथे काव्य रसिक कविता सादर करतात. फेसबुकवरील  ‘पोएट्री अफेअर्स ऑफ इंडिया’ या पानावरूनकार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा कट्टा तलावपाळीजवळील ‘कॅफे वर्व’ येथे आयोजित करण्यात येतो. कविता लिहिण्यासाठी उत्तेजन मिळावे यासाठी कार्यक्रमामध्ये पुढील सत्रासाठी एक विषय दिला जातो. त्यावर काव्यरसिक मंडळी कविता लिहून सादर करतात.

‘पोएट्री टय़ुजडे’ही चळवळ केवळ ठाणे शहरापुरतेच मर्यादित न राहता देशभरातील काव्यप्रेमींसाठी इंटरनेटच्या माध्यमातून पोएट्री अफेअर्स

ऑफ इंडिया हे यूटय़ूब चॅनेल सुरू करण्यात आले आहे. त्यावर कोणीही कोणत्याही विषयांवरील कविता त्यावर दृक्श्राव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतात.

– अनीश व्यवहारे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 2:26 am

Web Title: poetry cafe to increase material movement
Next Stories
1 सावधान, ठाणे पोलीस ‘ऑनलाइन’ आहेत!
2 याचसाठी केला होता का टॅब अट्टहास?
3 महिला पोलिसांसाठी ‘चेंजिंग रूम’ची सुविधा
Just Now!
X