ऋषीकेश मुळे-आशीष धनगर

वाहतूक कोंडी, पाणीटंचाईवर मार्मिक भाष्य; समाजमाध्यमावरून तरुणाईचा ‘जागर’

कितीही गंभीर समस्या असली तरी, व्यंगचित्रांद्वारे केलेली तिची मांडणी सुजाण मनांना अधिक भिडते. समाजमाध्यमांवर अशा व्यंगचित्रांना पसंती असली तरी, मार्मिक विनोदी ढंगाने एखाद्या समस्येवर भाष्य करणाऱ्या ‘मेम’चीही चलती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील समस्यांवर टिप्पणी करणाऱ्या असंख्य ‘मेम’ सध्या नेटकरींच्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ठाणे मेम्स आणि कल्याण मेम्स नावाच्या पेजवर शहरांवर भाष्य करणारे विविध मेम्स् समाजमाध्यम वापरकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरू लागली आहेत.  ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, कल्याण- डोंबिवलीमधील रखडलेल्या पत्री पुलाचे बांधकाम, अंबरनाथ- बदलापूरमधील तीव्र पाणीटंचाई यासारख्या अनेक समस्यांवर केले जाणारे हे व्यंग निवडणूक काळात गाजू लागले आहेत. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडंबदर मार्गावर सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी मेमच्या माध्यमातून दर्शवण्यात आली आहे. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या कामाची संथगती, डोंबिवलीतील पत्रीपूल पाडल्यानंतर त्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी, अंबरनाथ- बदलापूरमधील पाणीटंचाई यांवर भाष्य करणाऱ्या मेम सध्या समाजमाध्यमांवर चांगल्याच गाजत आहेत.

संयुक्त राष्ट्र संघटनेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार जगात एकूण जेवढे गतिरोधक आहेत त्यापैकी १९.०९ टक्के गतिरोधक हे  बदलापूरमध्येच आहेत.

‘‘बदलापुरातील एक तरुणी नव्या वर्षांचा संकल्पाचा विचार करत असते- यंदाच्या वर्षीचा माझा संकल्प आहे की मी रोज आंघोळ करीन पण.. ‘बदलापुरात सोमवार ते बुधवार पाणी’ नाही..’’

दोघांच्या सान्निध्यात तासभर सहज निघून जातो. एक पु.ल. दुसरा कल्याणचा ‘पत्री पूल’

मेम्स्च्या माध्यमातून अधिक उपरोधकपणे एखाद्या घटनेवर किंवा समस्येवर भाष्य करणे सोपे झाले आहे. अनेक जण आता या अशा मेम्सचे चाहते होऊ लागले आहेत. यातून एखाद्या समस्येविषयीचा ताणही हलका होतो आणि या समस्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून जनजागृतीही होते.

– चेतन भोईर, मेम्स् आर्टिस्ट