अमेरिकेत व्हायरल झालेल्या ‘पोके वॉक’चे लोण दादर, पवई, वांद्रे, अंधेरीनंतर आता मुंबईच्या पूर्व उपनगरात पसरू लागले आहे. ‘पोकेमॉन’च्या शोधात आज मुलुंड पश्चिम येथे १५० किशोरवयीन मुलांनी ‘पॉके वॉक’ केले. विशेष म्हणजे या मुलांना सुरक्षित चालता यावे याकरिता आयोजकांच्या माता-पित्यांनी त्यांना साथ दिली.

कार्टून जगतातील ‘पोकेमॉन’ हे सुप्रसिद्ध पात्र लहान मुलांचे अतिशय आवडते आहे. मुलुंडमधील हर्ष मालिया, शुभ शहा, यश पांचाळ, व्योम रायचना हे चौघे ‘पोकेमॉन’ फॅन १९ वर्षीय युवक मित्र एकत्र आले. ‘पोकेमॉन’बद्दल लहानपणापासून अत्यंत जिव्हाळा असल्याने त्यांना इतर ठिकाणी चालणाऱ्या ‘पोकेमॉन’च्या चळवळीविषयी माहिती मिळाली. या चळवळीचा एक भाग बनण्यासाठी या चौघांनी ‘फोर हॉर्समॅन’ हा ग्रुप स्थापन करून त्याची एक वेबसाइट बनवली. त्यावर २५० लोकांनी नोंदणी केल्याचे हर्ष मालिया याने सांगितले.

आज या ग्रुपवर नोंदणी केलेल्यापकी १५० ‘पोकेमॉन’प्रेमींनी एलबीएस मार्गावरील निर्मल लाइफ स्टाइलपासून ‘पोके वॉक’ला सुरुवात केली. त्यानंतर हे ‘पोके वॉक’ योगी हिलजवळील सायप्रस सोसायटीजवळ समाप्त झाले. विशेष म्हणजे अतिशय शिस्तीत कोणताही घटना घडू नये याची काळजी चारही आयोजकांच्या पालकांनी उपस्थित राहून घेतली. त्याकरिता त्यांनी रस्त्याच्या कडेने दोरी धरण्याचे काम केले.