• ठाणे, उल्हासनगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
  • ५० गुंड तडीपार, दहा टोळय़ांवर मोक्का

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे व उल्हासनगर शहरांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारी प्रवृत्तींना आतापासूनच शहराबाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. या दोन्ही शहरांतील ५० हून अधिक गुंडांवर तडीपारीची, तर दहा गुंड टोळय़ांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्याचा पोलिसांचा प्रस्ताव आहे. याशिवाय दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या अडीच हजार गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या गुंडांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे तसेच उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे दोन्ही शहरांतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशा वेळी गुंड प्रवृत्तींचा दहशत पसरवण्यासाठी वापर होऊ नये, यासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आतापासून पावले उचलली आहेत.  ‘‘ठाणे तसेच उल्हासनगर या दोन्ही शहरांतील गुंडांची सविस्तर यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ५० हून अधिक सराईत गुंडांवर तडीपारीचे, तर १० गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार केले आहेत. तसेच दोन्ही शहरांमध्ये सक्रिय असलेल्या दहा गुंड टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे प्रस्तावही तयार करण्यात आले आहेत,’’ अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिली.

अडीच हजार गुन्हेगारांची यादी..

ठाणे तसेच उल्हासनगर शहरामध्ये दोनपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अडीच हजार गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे डुम्बरे यांनी सांगितले.

शहरांच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी..

ठाणे तसेच उल्हासनगर या दोन्ही शहरांच्या प्रवेशद्वारावर तसेच प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात येणार असून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. निवडणुकीत पैशांचा आणि गुंडांचा वापर होऊ नये म्हणून नाकाबंदीमध्ये सर्व वाहनांची तपासणी केली जाणार आहे, असेही डुम्बरे यांनी सांगितले.

समाजमाध्यमांवर नजर..

समाजमाध्यमांवर होणाऱ्या अपप्रचारांवर नजर ठेवण्याचे काम विशेष पथकामार्फत केले जाणार असून ही पथके फेसबुकवरील प्रचारावर नजर ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे व्हॉटसअ‍ॅपवर होणाऱ्या अप्रचाराबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्या तर त्यावरही हे पथक कारवाई करणार आहे.