नववर्षांच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ भागांत विविध ठिकाणी छापे

उल्हासनगर : नववर्षांच्या पूर्वसंध्येला परिमंडळ चारच्या पोलिसांनी उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ तालुक्यांतील ग्रामीण भागात अवैध मद्यविक्रीची केंद्रे उद्ध्वस्त केली आहेत. विविध ठिकाणी आठ विक्री केंद्रांवर पोलिसांनी कारवाई करत शेकडो लिटर मद्य जप्त केले आहे, तर याप्रकरणी ११ हून अधिक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नववर्षांच्या स्वागताला गावठी आणि हातभट्टीच्या दारूची मोठी विक्री होत असते. त्यापूर्वी झालेल्या या कारवाईमुळे अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगर कॅम्प चार भागात चंद्रभागा बंगल्याच्या मागे मोकळ्या जागेत ८ कॅनमध्ये विक्रीसाठी ठेवलेली दारू विठ्ठलवाडी पोलिसांनी जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य दोन गुन्ह्यंमध्ये कॅम्प चार भागांत आशेळेगाव येथे तीन कॅन भरून दारू विक्री करत असताना दोन आरोपींविरुद्ध रॉयल गुरूनंद पॅलेसजवळ हातभट्टीची दारू पीत व विक्री करत असताना आढळून आल्याने दोघांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतर्गत पूर्वेतील टेस्टीबॉर्ड चायनीज दुकानाचे बाजूला बंदी असलेली दारू बाळगली म्हणून २१ वर्षीय दिलीप परब याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर उल्हासनगर कॅम्प पाच भागातील पुष्पकर्णी संकुलाच्या मागे मोकळ्या जागेत छुप्या पद्धतीने दारू विक्री करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी महेश राठोड याच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

अंबरनाथ तालुक्याचा ग्रामीण भाग म्हणून ओळख असलेल्या नेवाळी गाव येथे हातभट्टीची दारू बाळगली म्हणून राजेश गमरे याच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅम्प एक भागात भय्यासाहेब आंबेडकर नगरमधील सार्वजनिक शौचालयाशेजारी आणि कॅम्प दोन भागात रमाबाई आंबेडकर नगर येथील श्रीराम चौक येथे हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आल्याने गणेश हजारे आणि अभिषेक झा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या आठ गुन्ह्यांमध्ये ११ जणांहून अधिक व्यक्तींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नववर्षांच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या या धडक कारवाईत शेकडो लिटर गावठी व हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.