लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ई चलानद्वारे दंड आकारूनही तो भरण्यात टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली असून त्यामध्ये सर्वप्रथम आलिशान वाहनांच्या चालकांना लक्ष्य केले आहे. ई चलान मिळूनदेखील दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अशा वाहनमालकांकडून पोलिसांनी शुक्रवारी २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

ठाण्यात विनाहेल्मेट वाहन चालविणे, सिग्नलचा नियम मोडणे, भरधाव वाहन चालविणे, कारमध्ये बसल्यावर सीटबेल्ट न वापरणे असे प्रकार घडत आहेत. अशा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलीस वाहनाचे छायाचित्र काढून ई चलानद्वारे कारवाई करत असतात.  मात्र, या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंडाची रक्कम भरली जात नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रलंबित दंडाची रक्कम वसूल झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रलंबित दंड असलेल्या वाहनचालकांना ३० नोव्हेंबरपूर्वी दंडाची रक्कम भरण्याच्या सूचना उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी

दिल्या होत्या. दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांमध्ये आलिशान वाहने बाळगणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी आधी त्यांच्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. ठाण्यातील उपवन परिसरात पोलिसांनी नाकेबंदी करून ही कारवाई सुरू केली आहे. या परिसरातून जाणाऱ्या ऑडी, बीएमडब्लूसारख्या महागडय़ा कार वापरणाऱ्या चालकांना अडवून त्यांच्याकडून प्रलंबित दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. यामध्ये चार ते पाच वाहनचालकांकडून २५ हजार रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.