पोलिस आणि ‘एसीबी’कडून चौकशी होणार

डोंबिवली : बनावट कागदपत्र, शिक्क्यांचा आधारे डोंबिवलीत बेकायदा इमारतींमधील सदनिका नोंदणीकरण व्यवहारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ठाणे गुन्हे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. सह दुय्यम निबंधकांकडून नोंदणीकरण करण्यात आलेले काही दस्तऐवज या दोन्ही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. प्राथमिक स्तरावर या दोन्ही यंत्रणा आपल्या पद्धतीने सध्या तपास करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील वरळी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डोंबिवलीतील गांधीनगर मधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकरण करण्यात आलेले काही दस्तऐवज मिळाले आहेत. नोंदणीकरण करण्यात आलेली कागदपत्रे योग्य आहेत किंवा नाहीत हे पाहण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरळी मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या अधिकाऱ्याने या बनावट कागदपत्रांच्या खात्रीसाठी डोंबिवलीतील ज्या गृहस्थाला संपर्क केला होता, त्या गृहस्थानेही अशाप्रकारची विचारणा आपल्याकडे झाल्याची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. प्राथमिक स्तरावर हा कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम सुरू असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तपासाविषयी गुप्तता पाळली आहे.

या संदर्भात बनावट सदनिका व्यवहारांची कागदपत्रे हाती असलेल्या ‘एसीबी’च्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला, त्यानेही या विषयी बोलणे टाळले. मात्र अशाप्रकारचे डोंबिवलीतील नोंदणीकरणाचे दस्तऐवज हाती आले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

या बनावट दस्तऐवज नोंदणीकरणाची तक्रार शहरातील एका दक्ष रहिवाशाने मुख्यमंत्री, महसूल प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे केली आहे.ठाणे पोलीस आयुक्तालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणातील वास्तवता तपासून त्याप्रमाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण, गुन्हे शाखा, हस्ताक्षरतज्ज्ञ डोंबिवलीतील नोंदणीकरण कार्यालयात करण्यात आलेल्या बेकायदा इमारतींमधील सदनिका खरेदी विक्री व्यवहारांची तपासणी करणार असल्याचे या प्रकरणातील तक्रारदाराने सांगितले.

नोंदणीकरण थांबविण्याचे आदेश

सर्वाधिक बेकायदा इमारती नांदिवली पंचानंद, देसलेपाडा, भोपर, आडिवली ढोकळी, सागाव, पिसवली, गोळवली, सोनारपाडा, मानगाव, मानपाडा भागांत झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेने या बेकायदा इमारतींमधील सदनिकांचे नोंदणीकरण थांबविण्याचे आदेश कल्याण, डोंबिवलीतील दुय्यम निबंधकांना दिले आहेत.

नोंदणी नियमात जशी नियमावली आहे. त्याप्रमाणे नगरविकास विभागाने आपल्या कायद्यात नगररचना विभागाचे ना हरकत असल्याशिवाय नोंदणी करू नये अशी तरतूद करणे आवश्यक आहे.बाहेर काय होत आहे याची आपणास माहिती नाही पण, कार्यालयात कोणतेही नियमबाह्य़ व्यवहार होत नाहीत.

      – उमेश शिंदे, सह दुय्यम निबंधक, डोंबिवली