किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : शहरातील महामार्गावर अवजड वाहनांच्या अवेळी होणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली असून ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी समन्वय साधून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अवजड वाहनांची अवेळी होणारी वाहतूक रोखून धरण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी जागेचा शोध सुरू केला आहे. येत्या आठ दिवसांत जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी अवजड वाहतूक किती वेळ रोखून धरता येऊ शकते, याची चाचपणी पोलिसांकडून केली जाणार आहे. या नव्या नियोजनामुळे ठाणे शहरासह शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे.

खासगी वाहनांची संख्या रस्त्यावर वाढल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच उरण येथील जेएनपीटी बंदरातून ठाणे, भिवंडीच्या दिशेने दररोज होणाऱ्या हजारो अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कोंडीत भर पडत आहे. या वाहनांना ठाणे शहरातून वाहतूक करण्यास दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी आहे. तरीही या नियमाकडे दुर्लक्ष करत अवजड वाहनचालक शहरातून वाहतूक सुरूच ठेवतात. अवेळी होणाऱ्या या वाहतुकीमुळे ठाणे शहरात सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा फटका शहरातील वाहतुकीलाही बसतो. गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे शहरासह शिळफाटा मार्गावर ही कोंडी होते. अवजड वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध नसल्यामुळे शिळफाटा मार्गालगत वाहने उभी केली जातात. त्याचा फटका येथील वाहतुकीला बसतो.

ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस एकमेकांशी समन्वय साधून उपाययोजना करीत आहेत. नवी मुंबई येथून येणारी अवजड वाहने ठाण्यात सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत येऊ नयेत, यासाठी नवी मुंबई पोलीस प्रयत्न करणार असून या वाहनांना नवी मुंबईत रोखून धरण्यासाठी पोलिसांनी जागेचा शोध सुरू केला आहे. येत्या आठ दिवसांत जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी अवजड वाहतूक किती वेळ रोखून धरता येऊ शकते, याची चाचपणी पोलिसांकडून केली जाणार आहे,

नवी मुंबईतून येणारी अवजड वाहने ठाण्यात ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त जाणार नाहीत. यासाठी नियमावली आखण्यात येत आहेत. येत्या आठवडय़ाभरात त्यासंदर्भात नियम ठरविले जातील.
– पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतूक शाखा, नवी मुंबई पोलीस.