News Flash

अवैध उपसा करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई

अचानक झालेल्या या कारवाईने रेती माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला.

मुंब्रा, डोंबिवलीत १२ कोटींचे साहित्य जप्त

मुंब्रा, डोंबिवली खाडी किनारी अवैध उपसा करणाऱ्या रेती माफियांवर महसूल विभागाने शनिवारी संध्याकाळपासून कारवाई सुरू केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १२ कोटी ३० लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे रेती माफिया शनिवारी संध्याकाळपासून मुंब्रा, डोंबिवली गणेशघाट, ठाकुर्ली, कुंभारखाणपाडा, कोन, भिवंडी परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करतात, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली होती. सोमवार ते शुक्रवार हे रेती माफिया रात्रीच्या वेळेत कंदिल, मिणमिणता दिवा होडीत ठेऊन रात्रभर रेती उपसा करून, दिवसा गायब होत होते. रेती माफिया क्रूर असल्याने त्यांच्याकडून दगाफटका होण्याची भीती असल्याने महसूल विभागाचे कर्मचारी रात्रीच्या वेळेत त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नव्हते.
शनिवारी, रविवार या दोन्ही दिवशी खाडी किनारी मोठय़ा प्रमाणात रेती उपसा होत असल्याने बोटीतून प्रवास करून माफियांवर कारवाई करण्याचा निर्णय जोशी यांना घेतला. शनिवारी संध्याकाळपासून बोटीतून प्रवास करीत मुंब्रा, कळवा भागातील रेती माफियांवर त्यांनी कारवाई केली. रविवारी सकाळी जोशी यांनी डोंबिवली, कल्याण, भिवंडी रेतीबंदर खाडी किनारी धडक मारली.
अचानक झालेल्या या कारवाईने रेती माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला. चार कामगार पकडण्यात पोलिसांना यश आले.

कारवाई पथक
जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार विकास पाटील, कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे, जीवन गलांडे, ठाणे, भिवंडी, कल्याण येथील महसूल विभागातील कर्मचारी, पोलीस असे १५० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 5:30 am

Web Title: police arrest sand mafia
टॅग : Sand Mafia
Next Stories
1 डम्परच्या धडकेत तरुणी ठार
2 दोन आरोपी नगरसेवकांची प्रकृती बिघडली
3 समर्थकांचा गोंधळ; राबोडीत बंद