महागडय़ा मोबाइलच्या विक्रीची जाहिरात ‘ओएलएक्स’वर देणाऱ्या जाहिरातदारांना गंडा घालणाऱ्या दुकलीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली असून, या दोघांनी अशाप्रकारे तीन जाहिरातदारांना गंडा घातल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे ९९ हजारांचे तीन महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

ऑनलाइनद्वारे वेगवेगळे साहित्य आणि वस्तूंच्या विक्रीसाठी जाहिरात देणाऱ्या जाहिरातदारांना आता चोरटय़ांनी लक्ष्य केल्याचे या टोळीच्या कार्यपद्धतीवरून उघड झाले आहे.
शहाना हाजीर खान ऊर्फ हवा (२८) आणि हसीब अल्ताफ शेख (२०) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून दोघेही मुंब्रा परिसरात राहतात. शहाना हिला सलमा, आफरीन, यासीन आणि फलक या नावांनी ओळखले जाते. जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून वाहनांच्या विक्रीकरिता अनेक जण ‘ओएलएक्स’वर जाहिरात देतात. त्यामुळे अशा जाहिरातदारांना गंडा घालण्यास या दोघांनी सुरुवात केली होती. ‘ओएलएक्स’वर महागडे मोबाइल विक्रीच्या जाहिराती शोधून त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि व्यवहारासाठी भेटीचे ठिकाण ठरवायचे. त्यासाठी दोन्ही बाजूंनी बाहेर पडता येऊ शकेल, अशा इमारतींची ठिकाणे निवडत होते. तसेच खरेदीचा व्यवहार सुरू असतानाच शेजारच्या इमारतीत राहात असल्याचे सांगून तिथे आईला मोबाइल दाखवून आणते, अशा बहाण्याने इमारतीच्या दुसऱ्या बाजूच्या मार्गाने पोबारा करायचा, अशी त्यांची कार्यपद्धती होती.
अशाप्रकारे त्यांनी तीन जाहिरातदारांना गंडा घातल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून सुमारे ९९ हजारांचे तीन महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.