मीरा-भाईंदरमधील १७ गुन्हे उघडकीस, ५० तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत

निळ्या रंगाच्या मोटारसायकलवर सोनसाखळी चोर फिरत आहेत केवळ एवढय़ाच तुटपुंज्या माहितीच्या आधारे मीरा-भाईंदर शहरात धुमाकूळ घालणारे सोनसाखळी चोर गजाआड करण्यात नयानगर पोलीस यशस्वी ठरले आहेत. या अटकेमुळे मीरा-भाईंदरमधील तब्बल १७ गुन्हय़ांची उकल झाली असून चोरांकडून पन्नास तोळ्यांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

मीरा-भाईंदरमध्ये सोनसाखळी खेचण्याच्या अनेक घटना वाढीस लागल्या होत्या. एकटय़ा-दुकटय़ा महिला तसेच वरिष्ठ नागरिकांनाच लक्ष्य केले जात होते. दुचाकीस्वारांपैकी चालक हेल्मेट घालून असायचा व मागे बसलेला चोरीच्या वेळी तोंडावर रुमाल बांधायचा अशी या चोरांची काम करण्याची पद्धत होती. अशा प्रकारचे गुन्हे वाढीस लागल्याने पोलिसांनी स्वतंत्र गस्तीपथके तयार केली. ज्या ज्या ठिकाणी सोनसाखळी खेचण्याचे प्रकार घडले त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर तसेच काही भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बहुतांश गुन्ह्य़ात चोरांकडे निळ्या रंगाची दुचाकी असल्याचे दिसून आले. यावरून दोन व्यक्तींचेच हे काम असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. निळ्या रंगाच्या दुचाकींचा धागा पकडून या रंगाच्या दुचाकीवर करडी नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी गस्तीपथकाला दिले.

काही दिवसांपूवी गस्तीपथकातील पोलीस शिपाई प्रशांत विसपुते व पठाण मीरा रोडच्या नयानगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना निळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे जण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे दिसून आले. विसपुते यांनी दुचाकी थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील पाठीमागे बसलेला एक जण पळून गेला व दुसराही पोलिसांना गुंगारा देऊन पळण्याच्या तयारीत होता. मात्र विसपुते व पठाण यांनी शिताफीने त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्याचे नाव साजीदअली जाकीरअली सय्यद असे असून तो नयानगर परिसरातच राहत असल्याचे समजले. पळून गेलेल्याचे नाव अकबर आयुब अन्सारी हा मुंब्रा येथील रहिवासी होता. पोलिसी खाक्या दाखवताच साजीदने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अकबरच्याही मुसक्या आवळल्या.दोघांनी मीरा-भाईंदरमध्ये १७ चोऱ्या केल्याचे कबूल केले, यापैकी ११ प्रकरणे नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली होती. साजीदअलीच्या झडतीत त्याच्याकडे पंधरा इंच लांबीचा सुराही सापडला. चोरलेले सोने मीरा रोडमधल्याच सराफांना ते विकत व आलेले पैसे आपली व्यसने पूर्ण करण्यासाठी उधळत असत अशी माहिती नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आर के जाधव यांनी दिली. साजीदअली हा मुंबईतून तडीपार झालेला असून त्याच्या नावावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात तब्बल तीस गुन्हे दाखल आहेत. काही काळ त्याने तुरुंगाची हवादेखील अनुभवली आहे.