कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मांडा-टिटवाळा विभागाचे नियंत्रक असलेल्या अ प्रभागातील आरोग्य विभागातील तीन कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ अटक केली. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या २१ वर्षांच्या इतिहासातील लाचखोरीची ही २९वी घटना आहे.

लाचखोरीमुळे कल्याण-डोंबिवली पालिका ही राज्यातील २६ महापालिकांमध्ये सर्वाधिक भ्रष्ट व लाचखोर महापालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या भ्रष्ट कारभारामुळे कोणीही आयएएस दर्जाचा आयुक्त या पालिकेत येण्यास तयार नाही.

जूनमध्ये रवी गायकवाड या ठेकेदाराने टिटवाळा भागातील नाले, गटारांची सफाई करण्याची कामे पूर्ण केले. या कामाचे देयक काढण्यासाठी मुख्य आरोग्य निरीक्षक संजय धात्रक, आरोग्य निरीक्षक सदाशिव ठाकरे, कामगार विजय गायकवाड यांनी रवी गायकवाड यांच्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. धात्रक यांना तडजोडीने २० हजार आणि अन्य कर्मचाऱ्यांना २० असे एकूण ४० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या तिन्ही कर्मचाऱ्यांनी देयक न काढल्याने गायकवाड यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला या प्रकरणाची माहिती दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक आर. आर. चव्हाण यांनी सोमवारी सकाळी ‘अ’ प्रभाग कार्यालयाबाहेर एका हॉटेलात सापळा लावला. धात्रक, कराळे व ठाकरे यांना रवी गायकवाड यांच्याकडून चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.