ठाण्यातील कळवा बाजारपेठेत असलेल्या सायबा बारमध्ये बिल भरण्याच्या वादातून पोलिसांनी बारमधील मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी हॉटेलमध्ये घातलेला धिंगाणा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अद्याप या प्रकरणी संबंधितांवर कारवाई झालेली नाही. ही घटना २७ ऑगस्टला घडली होती. मात्र, अजूनही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे बार मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

२७ ऑगस्टला सदरची घटना घडून देखील अद्यापही पोलिसांवर कारवाई न झाल्यामुळे बार मालकांनी नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार नेहमीचाच असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. ठाण्यातील कळवा परिसरात सायबा बारमध्ये २७ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास कळवा पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचमधील काही पोलीस कर्मचारी मद्यपान करण्यासाठी बारमध्ये आले. मात्र, बिल आणल्यानंतर त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मॅनेजरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यालाही मारले. प्रवीण संखे, राजा पाटील यांच्यासमवेत इतर पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप बारमधील कर्मचाऱ्यांनी केला आहे. ठाण्यातील बारमध्ये पोलिसांनी किरकोळ कारणावरून मारहाण करण्याची घटना काही नवीन नाही. यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याप्रकरणाचा संपूर्ण तपास हा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.