ठाण्यातील देसाई गावात गावठी दारुच्या भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून हे तिघेही देसाई गावातील रहिवासी आहे.

ठाण्यातील डायघर परिसरात देसाई गाव असून या गावात गावठी दारुच्या भट्ट्या सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. देसाई गावातील खाडी परिसरात या भट्ट्या सुरु असून या ठिकाणी गावठी दारुची विक्रीही सुरु होती. यानुसार सोमवारी ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने देसाई गावात छापा टाकला. पोलिसांना बघून गावठी दारुच्या भट्ट्या चालवणाऱ्या तीन जणांना घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन तिघांनाही अटक केली. लालचंद देवकर, प्रशांत रोकडे आणि त्यांच्या आणखी साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. २०० लिटर क्षमतेचे  २२५ प्लास्टिकचे ड्रम, या प्रत्येक ड्रम मध्ये १५० लिटर नवसागर मिश्रित गूळ  तसेच ३३,७५० लिटर कच्चे रसायन ५०० लिटर क्षमतेचे ४ पत्र्याचे ढोल, दोन अॅल्युमिनियमची पतेले असा ४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.