कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस कर्मचारी प्रमोद शिंदे याला सुलताना शेखच्या हत्येप्रकरणी रविवारी पोलिसांनी अटक केली. सुलताना आणि प्रमोद यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यानेच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. त्या आधारे पोलिसांनी तपास करून या प्रकरणात प्रमोदला अटक केली.
कल्याण-शीळ रस्त्यावरील लोढाजवळील देसाई खाडीकिनारी सुलताना शेख हिचा मृतदेह १३ सप्टेंबर रोजी आढळला होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असलेल्या प्रमोद शिंदे याने तिची हत्या केल्याचा आरोप सुलतानाची आई जन्नतबी यांनी केला होता. दोन वर्षांपासून प्रमोद याच्यासोबत सुलताना हिचे प्रेमसंबंध होते. विवाहित असतानाही प्रमोदने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. १० सप्टेंबरला त्याने तिला जेवायलाही बोलावले होते. त्यामुळे त्यानेच तिची हत्या केल्याचा आरोप तिची आई जन्नतबी यांनी केला आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुलतानाचा मृतदेह २० सप्टेंबर रोजी पुन्हा शवविच्छेदनासाठी पाठविला. त्या अहवालानंतर तिच्या मृत्यूचे गूढ उलगडले. तसेच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासामध्ये १ ते १० सप्टेंबर या कालावधीत प्रमोद आणि सुलताना यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस कर्मचारी शिंदे याच्यासह अजूनही काही पोलीस या प्रकरणी दोषी असण्याची शक्यता जन्नतबी यांनी वर्तविली आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.