वाढत्या गुन्हेगारी घटनाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस व नागरिक यांच्या संवाद कार्यक्रमात पोलिसांची ग्वाही
ठाण्यातील नौपाडा परिसरातील काही भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचणे, ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील चैन खेचणे, महिलांची छेडछाड, परिसरातील होणाऱ्या चोऱ्या, नाक्या नाक्यावरील पाकीटमार, गर्दुल्ले, रात्रीच्या वेळेस दुचाकी वाहनांची मोडतोड, वाहन चोरी आदी प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये पोलीस चौकी असणे आवश्यक झाले आहे. तसे निवेदन येथील नागरिकांनी पोलीस ठाणे आणि स्थानिक आमदारांना दिले होते. त्या अनुषंगाने नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले यांनी तेथील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून नागरिकांना आपल्या भावनांना व्यक्त करण्याची संधी दिली.
ठाण्यातील नौपाडा परिसरातील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून येथील नागरिकांनी या भागात पोलीस चौकी करण्याबरोबरच पोलिसांची गस्ती वाढवण्याची विनंती केलीहोती. त्यावरून भाजपच्या वतीने चंदनवाडी, सिद्धेश्वर तलाव परिसरातील नागरिकांचा व पोलिसांचा एकत्रित संवादाच्या कार्यक्रम चंदनवाडी येथील उद्यानामध्ये आयोजित केला होता. या वेळी आमदार संजय केळकर, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुल्ले तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
या परिसंवादात नागरिकांनी परिसरातील त्रास आणि समस्यांबाबत पोलिसांशी मोकळेपणाने संवाद साधून माहिती दिली. परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सिद्धेश्वर तलाव परिसरात चौकी उभारण्याची तसेच अधिकच्या गस्तीची मागणी नागरिकांनी केली.

नागरिकांची कौफियत पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचवण्यात आली असून या परिसरात पोलिसांनी जास्त वेळ पोलीस गस्त ठेवण्याबाबत तसेच पोलिसांची मोबाईल व्हॅन येथे उभी ठेवणे बाबत पोलीस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. तसेच पोलिसांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यावर या ठिकाणी आमदार निधीतून पोलीस चौकी बांधण्यासोबतच या परिसरात सीसी टीवी कॅमेरे देखील लावण्यात येणार आहेत.
संजय केळकर, आमदार, भाजप

जागरूक नागरिक बनून पोलिसांना सहकार्य करावे. कायद्याचा धाक असल्याने नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे २०१५ च्या तुलनेत खूप कमी झाले असून असामाजिक कामांबाबत, घटनांबाबत नागरिकांनी दिलेल्या माहितीबाबत पोलीस नेहमी सहकार्याची भुिमका ठेवतील. परिसरावर लक्ष ठेवून पोलीस गस्त वाढवली जाईल व पोलीस मोबाईल व्हेन ही या परिसरात ठराविक वेळात ठेवली जाईल.
गजानन काब्दुल्ले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,नौपाडा