पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन; ‘खोटय़ा दागिन्यां’च्या सल्ल्यावर नाराजी

‘‘ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी महिलांनी खरे दागिने वापरू नये,’’ असा फुकाचा सल्ला देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे नवे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी कान पिळले आहेत. सोनसाखळी चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस का प्रयत्न करीत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनी फुकाचे सल्ले देणे बंद करावे, अशा शब्दांत आयुक्तांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. महिलांना सार्वजनिक ठिकाणी खरे दागिने परिधान करता यावेत तसेच त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी, यासाठी मोहीम आखण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.

सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालून चोरटय़ांना जेरबंद करण्याऐवजी ठाण्यातील काही वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनजागृती मोहीम राबवीत आहेत. ही माहिती देताना सार्वजनिक ठिकाणी खरे दागिने परिधान करू नका, असे सल्लेही काही अधिकाऱ्यांनी दिले. हे लक्षात येताच परमवीर सिंग यांनी प्रथम ही जनजागृती बंद करण्याचे आदेश काढले. महिलांना दागिने परिधान करण्याचा अधिकार असून त्यांना संरक्षण पुरविण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे सल्ले देण्याचे काम बंद करा, अशा स्पष्ट सूचनाही दिल्या.

पोलिसांचे सल्ले

सोनसाखळी चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहिमेद्वारे विविध सल्ले दिले. महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन करू नये, अंगावरील दागिने झाकावेत, शक्यतो खोटे दागिने परिधान करावेत आणि चोरटय़ांपासून बचाव करण्यासाठी मिरची पूड बाळगावी, अशा स्वरूपाचे हे फुकटचे सल्ले होते.

महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन करू नये, असा सल्ला देणेही चुकीचे आहे. महिलांना दागिने घालण्याचा अधिकार असून त्यांना संरक्षण पुरविण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे सल्ले देणाऱ्या मोहिमा बंद केल्या आहेत.

– परमवीर सिंग,

पोलीस आयुक्त.