देशातल्या सर्व समाजांतील लोकांनी एकमेकांच्या सणात सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या देशातील बंधुभाव वाढीस लागण्यास मदत होईल, अशा भावना ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी व्यक्त केल्या. अंबरनाथ पोलीस ठाणे आणि मुस्लीम जमात अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार रोजा पार्टीच्या कार्यक्रमाप्रसंगी परमबीर सिंह बोलत होते.
अंबरनाथच्या कोहोजगांव गैबनशह मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पुढे सिंह म्हणाले की, प्रत्येक धर्मीयांनी एकमेकांचे सण एकत्र येत साजरे केल्याने कटुता नाहीशी होऊन आपुलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे सध्या हे सण एकत्र येत साजरे होणे आवश्यकही आहे. तसेच रोजा, नमाज, हज या गोष्टी रमजानच्या पवित्र महिन्यात अत्यंत महत्त्वाच्या असतात. रमजानमधील रोजाचा अर्थ फक्त अन्न वर्ज करणे असा नसून चांगले विचार नेहमी मनात यावेत आणि अल्लाहने सांगितलेल्या सत्मार्गावर चालणे असा आहे. त्यामुळे रमजानला अनन्यसाधारण महत्त्व असून दरवर्षी पोलिसांकडून रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाईल, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. या इफ्तार पार्टीत पोलीस आयुक्त सिंह यांनी मुस्लीम मौलाना आणि उपस्थित हिंदू बांधवांबरोबर अल्पोपाहार घेत संध्याकाळी रोजा सोडला.