नातेवाईकांना ओळख पटली, तरी  पोलिसांना डीएनए चाचणीची प्रतीक्षा

नालासोपारा येथील व्यापारी नरेंद्र मिश्रा याच्या हत्येला वेगळी कलाटणी मिळाली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी कपडय़ावरून त्याची ओळख पटवली असली तरी जोपर्यंत डीएनए चाचणी अहवाल येत नाही, तोपर्यंत मृतदेह नरेंद्रचा आहे, असे मानता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न करता केवळ अपहरणाचाच गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपाऱ्याच्या संखेश्वर नगरात राहणारा कापड व्यापारी नरेंद्र मिश्रा (३२) ४ मार्चपासून बेपत्ता होता. तुळिंज पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. भिवंडीच्या पडघा येथे पोलिसांना ८ मार्च रोजी एक मृतदेह सापडला होता. हा मृतदेह नरेंद्रचाच असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. या संपूर्ण प्रकरणात तुळिंज पोलिसांनी दाखवलेला हलगर्जीपणा आणि चालढकल वृत्तीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रविवारी संध्याकाळी तुळिंज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.

भिवंडी पोलिसांना सापडलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांनी तो नियमानुसार दफन करून टाकला आहे, परंतु हा मृतदेह नरेंद्रचाच आहे हे मानायला पोलीस तयार नाहीत.

मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाही. त्याचा चेहरा विद्रूप झालेला होता. आम्ही डीएनए चाचणीसाठी काही नमुने पाठवले आहेत. त्याचा अहवाल येईलपर्यंत तो मृतदेह नरेंद्रचा आहे, असे मानले जाणार नाही, असे नालासोपारा विभागाचे उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले.

कुटुंबीयांनीही सुरुवातीला तो मृतदेह नरेंद्रचा असल्याचे नाकारले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप नातेवाईकांनी मृतदेहावर दावा सांगितलेला नाही, असेही ते म्हणाले.त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न करता केवळ अपहरणाचाच गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचा हलगर्जीपणा?

नरेंद्रचे ४ मार्च रोजी अपहरण करण्यात आले. त्याच दिवशी त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी बेपत्ता अशी नोंद केली. दोन दिवसांनी कुटुंबीयांनी नरेंद्रचे अपहरण झाल्याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ज्या दोघांवर अपहरण केल्याचा संशय होता, त्या रोहित आणि पंकज सिंग यांची नावे पत्नीने पोलिसांना दिली होती, परंतु पोलीस उपनिरीक्षक रमेश घायगुडे यांनी केवळ त्यांची चौकशी करून सोडून दिले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्या वेळी आरोपींकडून आम्हाला काही संशयास्पद मिळाले नव्हते, म्हणून आम्ही त्यांना सोडून दिले. या प्रकरणात हलगर्जीपणा झाला नाही, असे उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी स्पष्ट केले.

मृतदेह नरेंद्रचाच.. कुटुंबीयांचा दावा

नरेंद्र मिश्रा याच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आरोप फेटाळले. त्याचे कपडे, हातातील धागा आणि इतर वस्तू यावरून हा मृतदेह नरेंद्रचाच असल्याचे त्याचा भाऊ  राजू मिश्रा याने सांगितले. आम्ही जी छायाचित्रे पाहिली, ते पाहून तो मृतदेह नरेंद्रचाच असल्याचे स्पष्ट होते. आपल्या चुकावर पांघरूण घालण्यासाठी पोलीस हा बनाव रचत असल्याचा आरोप त्यांनी केला.