23 November 2017

News Flash

ठाण्यात कार चालकाने पोलीस कॉन्स्टेबलला फरफटत नेले

चालकाला अटक

ठाणे | Updated: September 14, 2017 1:25 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाण्यात एका कार चालकाने पोलीस कॉन्स्टेबलला तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली असून यामध्ये नौपाडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रेवनाथ शेकडे जखमी झाले आहेत. या प्रकरणी कार चालक नवीन राय याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत कारमध्ये असणारी महिला फरार झाली आहे. सध्या पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

नितीन कंपनीच्या भागात रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या कारमध्ये चालक आणि एक महिला बसली होती. नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, या संशयित कारची तपासणी करण्यासाठी कॉन्स्टेबल रेवनाथ शेकडे कारकडे येत असल्याचे पाहून चालकाने कार सुरु केली. त्यांनी कारच्या बोनेटला पकडून गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रेवनाथ शेकडे यांना फरफटत नेले.

हा प्रकार पाहून नागरिकांनी कार चालकाला थांबवत गाडीची तोडफोड केली. या गोंधळात कारमधील महिलेने येथून पळ काढला. त्यानंतर वाहन चालकाला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सरकारी कामात अडथळा आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कार चालक नवीन राय याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on September 13, 2017 9:53 pm

Web Title: police constable gets thrashed by car driver in thane