आठवडाभरात १०० हून अधिक पोलीस करोनाबाधित

ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास सर्वच शहरांमध्ये करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना गेल्या आठवडाभरात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा विळखा बसला आहे. गेल्या चार दिवसांत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला.

करोनाचा कहर सुरू झाल्यापासूनच ठाणे पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने बाधित झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी करोनाबाधितांची संख्या कमी होत होती. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मात्र पुन्हा हा आकडा वाढू लागला आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. विसर्जनादरम्यान खूप बंधने घालूनही काही भागांत गर्दी झाल्याचे चित्र दिसले. याचा फटका बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही बसला, अशी शक्यता आता व्यक्त होते आहे. गणेश विसर्जनानंतर करोनाबाधित पोलिसांचे प्रमाण वाढू लागले असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका ऱ्याने सांगितले.  ७ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पोलिसांच्या बाधित होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या कालावधीत एकूण १०८ पोलिसांना करोनाची लागण झाली असून त्यात १६ अधिकारी आणि ९२ पोलीस कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे. सर्वाधिक बाधित मुख्यालयातील पोलीस कर्मचारी होत आहे. त्यापाठोपाठ वाहतूक पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा सामावेश आहे.

ठाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयात येणा ऱ्या नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे काम असेल तरच व्यक्तीला प्रवेश दिला जात आहे.

चार दिवसांत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

विशेष शाखेत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सिद्धार्थ गायकवाड (५४) यांचा १४ सप्टेंबरला करोनामुळे मृत्यू झाला. ११ सप्टेंबरला त्यांना करोना झाल्याने स्पष्ट झाले होते. कोपरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र महाडिक (५१) यांचा १३ सप्टेंबरला मृत्यू झाला. त्यांच्यावर महिन्याभरापासून उपचार सुरू होते. भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भगवान वांगड (४८) यांचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.