मानपाडा विभागाचे वाहतूक पोलीस आता रात्रीच्या वेळेत कल्याण- शीळ फाटा रस्त्यावर शुकशुकाट असताना वाहतुकीचे नियोजन करण्याचे नाटय़ उभे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शीळ फाटय़ाकडून येणारी वाहने काटई नाका येथे पुढे कामे चालू आहेत म्हणून अडवून ठेवायचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
रात्रीच्या वेळेत कल्याण- शीळ फाटा रस्त्यावर तुरळक वाहने असतात. या वेळेत अवजड वाहने मोठय़ा प्रमाणात धावतात. मानपाडा विभागातील वाहतूक पोलीस रात्री ११ वाजल्यानंतर काटई नाका येथे मुख्य रस्त्यावर अडथळे उभे करतात, असा अनुभव आहे. शीळ फाटय़ाकडून येणारी सर्व वाहने काटई नाका येथे अडवून ठेवली जातात. यासाठी कल्याण, पत्री पूल भागात कामे सुरू आहेत, असे कारण वाहनचालकांना सांगण्यात येते. वाहतूक पोलिसांना वाहने अडवायची असतील तर ती शीळ फाटा येथे अडवावीत. म्हणजे अनेक वाहने मुंब्रा रस्त्याने पुढील मार्गाला निघून जातील असे काही वाहनचालकांनी सांगितले. पण शीळ फाटय़ाकडून चार किलोमीटर अंतरावरील काटई येथे हेतुपुरस्सर वाहतूक पोलिसांकडून वाहने अडवली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.