07 June 2020

News Flash

तपासचक्र  : धडावेगळय़ा शिराची उकल

धडावेगळे शिर सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्येचे कारण उघड करत आरोपीला अटक केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

धडावेगळे शिर सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हत्येचे कारण उघड करत आरोपीला अटक केली. मित्रासोबत गप्पाच्या ओघात त्याचे एक गुपीत दुसऱ्या मित्राला कळले आणि हे गुपितच त्या मित्रासाठी जीवघेणे ठरले.

१५ मार्चचा दिवस बदलापूरकरांसाठी जरा धक्कादायकच होता. बदलापूर पूर्वेतील कात्रप रस्त्यावर असलेल्या एका दुकानाबाहेर एका पिशवीत कापलेले शिर असल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. दुकानाबाहेर शिर पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमू लागली आणि लागलीच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तपास सुरू केला. श्वानपथक शिर सापडल्याच्या ठिकाणापासून चौफेर वास घेत धावत होते. त्यात तीन तास उलटून गेले होते. त्याच वेळी कात्रप रस्त्यावर जय मल्हार खानावळीशेजारील चायनीज कॉर्नरमधील एका गाळ्यात एक शिर नसलेले धड सापडल्याची माहिती मिळाली आणि तपासपथके त्या ठिकाणी पोहोचली.

साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे यांनी मृतदेहाची तपासणी केली. आता हे शिर आणि धड एकाच व्यक्तीचे आहे का, असा सवाल उपस्थित होत होता. जर तसे नसेल तर मग हे दोन मृतदेह तर नाही ना असाही सवाल उपस्थित होत होता. शिराच्या चेहऱ्याचा बराचसा भाग दाबला गेल्याने ओळख पटत नव्हती. ज्या गाळ्यामध्ये हा मृतदेह सापडला, त्या मालकाच्या मते हा चायनीज दुकान चालवणाऱ्याचा असावा, असा अंदाज व्यक्त केला गेला. त्या वेळी संभ्रम आणखी वाढला. मात्र त्याच वेळी साहाय्यक उपनिरीक्षक मंगेश खानविलकर, उपनिरीक्षक अनंत बोराडे यांच्या मदतीने शिर सापडल्याच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेराचे चित्रण मिळाले आणि सर्व चित्र स्पष्ट झाले. चायनीज कॉर्नरवर काम करणारा राजेशकुमार नेपाळी एका पिशवीत हे शिर तिथे ठेवून जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यानेच ही हत्या केला असावी, असा संशय पक्का झाला. मात्र तरीही हा मृतदेह कुणाचा हा प्रश्न अनुत्तरितच होता. त्याच वेळी पोलीस नाईक प्रीतम काळे, किरण अवचिंदे, रमेश जगदे आणि द्वारकानाथ कराळे यांच्या तपासात राजेश नेपाळीकडे रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचा मित्र आला होता, असे गाळामालकाने सांगितल्याने हा त्याचा मित्रच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र रात्री कोणताही आरडाओरडा नाही, भांडण नाही अशीही मालकाने पुष्टी जोडल्याने तपासात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे आरोपी सापडणे महत्त्वाचे होते. तोपर्यंत दुपारचा एक वाजला होता. आरोपीचे छायाचित्र हाती लागताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी ते छायाचित्र भुसावळचे शासकीय रेल्वे पोलीस आणि रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना व्हॉटस्अ‍ॅपद्वारे पाठवले आणि हत्येचा आरोप असल्याचे सांगितले. यामुळे भुसावळ रेल्वे स्थानकात येणाऱ्या आणि उत्तर प्रदेशमार्गे जाणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेसची तपासणी सुरू झाली. दीडच्या सुमारास भुसावळचे पोलीस सक्रिय झाले. त्याच वेळी मुंबईहून पुष्पक एक्स्प्रेस येणार असल्याचे समजले. रेल्वे पोलीस आणि जीआरपी यांनी दोन पथके तयार करत सुरुवातीच्या आणि शेवटच्या दोन डब्यांत तपास सुरू केला. गाडीत त्यांना छायाचित्राशी मिळतीजुळती व्यक्ती बसलेली आढळली आणि आरोपी ताब्यात घेतला. त्या संशयिताला तातडीने बदलापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

काही तासांतच आरोपी राजेश नेपाळी याला बदलापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणात २९ वर्षीय जगत तेगबहाद्दूर शाही याची हत्या झाली होती. जगत शाही हा नेपाळमधील दहिलेक जिल्ह्य़ातील दुल्लू तालुक्यातील सातखंबा येथील रहिवासी. शेतीची औषधे आणि कीटकनाशकांची विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय. आरोपी राजेश नेपाळी हाही येथीलच रहिवासी. राजेश नेपाळी हा बदलापुरात चायनीज कॉर्नरमध्ये कुकचे काम करत होता तर जगत शाही हा मुंबईतील नेपाळींकडून पैसे वसूल करण्यासाठी यायचा. नेपाळला परतण्यापूर्वी त्याने राजेश नेपाळीची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांची तशी ही पहिलीच भेट होती. तत्पूर्वी दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. नेपाळी असणे हाच या दोघांमधील दुवा. रात्री साडेदहाच्या सुमारास जगत हा राजेशकडे आला. आपले नेहमीचे काम संपवल्यानंतर दोघही दारू पीत बसले.

मद्याचा अंमल चढल्यावर गप्पांच्या ओघात राजेश नेपाळी याने पत्नीव्यतिरिक्त आपली एक प्रेयसी असून ती भोपाळमधील हबिबगंज येथे राहत असल्याचा उल्लेख केला. व्हिडीओ कॉल केल्यानंतर ती आपले अंगप्रदर्शन करते, असेही राजेशने जगतला सांगितले. राजेशच्या या गप्पा ऐकत असताना जगतलाही भरून आल्याने त्यानेही आपले नेपाळमधील प्रेमप्रकरण सांगण्यास सुरुवात केली. आपल्याच गावातील एका दूधवाल्याची सून ही माझी प्रेयसी आहे. तिचा नवरा मुंबईतच कुठे तरी राहतो. तिचा सासरा माझ्या घरी दूध देण्यासाठी येत असतो, असे जगतने राजेशला सांगितले. आपल्या प्रेयसीला आपल्यामुळे एक मुलगाही असून काहीच महिन्यांपूर्वी तिला महागडे घडय़ाळ भेट म्हणून दिल्याचेही जगतने राजेशला सांगितले. जगतच्या तोंडून त्याच्या प्रेयसीचे वर्णन एकून राजेश नेपाळीची नशा उतरली. कारण ते वर्णन दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नसून त्याच्या पत्नीचे होते. राजेशला धक्का बसला. बायकोच्या हातातील जगतने दिलेले घडय़ाळही त्याला आठवले आणि तिला झालेला मुलगा हाही जगतचाच असल्याचा त्याला विश्वास बसला. आपल्यासमोर बसलेली ही व्यक्ती आपल्या पत्नीचा प्रियकर, आपल्या मुलाचा बाप असल्याची गोष्ट त्याला सहन झाली नाही.

वरकरणी तो शांत दिसत असला तरी त्याच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरू होते. त्याने जगतला दारू पाजणे सुरूच ठेवले. मोठय़ा प्रमाणात मद्यपान आणि जेवण करून जगत झोपला. मात्र राजेशची झोप उडाली होती. त्यातच त्याने जगतला संपवण्याचा निर्णय घेतला आणि चायनीज कॉर्नरमध्ये असलेला सिलेंडर जगतच्या डोक्यात टाकला. त्यानंतर गळा चिरून त्याची हत्या केली. जगतची हत्या केल्यानंतर राजेशने पिशवीत त्याचे घेतलेले शिर दुकानाबाहेर ठेवून निघताना तो सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आणि त्याच एका भक्कम पुराव्यामुळे पोलिसांनी काही तासांत त्याला टिपला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी तत्कालिन पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकाऱ्यांसह केलेला हा तपास कौतुकास्पद होता. या प्रकरणाचा उलगडा केल्याप्रकरणी राजभोज यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरवण्यातही आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2017 1:01 am

Web Title: police detected badlapur murder case in just 12 hour
Next Stories
1 शासकीय वाहनामुळे ठाण्यात वाहतूककोंडी
2 मिठाईच्या दुकानांवर करडी नजर
3 पुलावरच लोकल प्रतीक्षा
Just Now!
X