News Flash

शहरबात : गुन्हेगारी समस्या सुटणार?

सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या जेमतेम साडेपाचशेच्या आसपास भरते.

मीरा-भाईंदरसाठी दोन उपअधीक्षक नेमण्यात आल्याने पोलीस विभागाच्या आणि पर्यायाने शहरातील गुन्हेगारीच्या समस्या सुटणार आहेत का? शहरात सहा पोलीस ठाणी असली तरी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राची परिस्थिती वेगवेगळी आहे. शहरातील गुन्हेगारीत वाढ होतच असून हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे.

मीरा रोड पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे विभाजन करून भाईंदरसाठी स्वतंत्र उपअधीक्षक पद नुकतेच निर्माण करण्यात आले आहे. आता मीरा-भाईंदरसाठी दोन उपअधीक्षक नेमण्यात येणार आहेत. परंतु उपअधीक्षकपदात वाढ करून पोलीस विभागाच्या आणि पर्यायाने शहरातील गुन्हेगारीच्या समस्या सुटणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. इथली वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धती या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र आयुक्तालय करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावावर विचार न करता शासनाने केवळ एक अतिरिक्त उपअधीक्षक देऊन बोळवण केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

मीरा-भाईंदरसाठी भाईंदर पश्चिम, भाईंदर पूर्व, उत्तन सागरी, मीरा रोड, नयानगर आणि काशिमीरा अशी सहा पोलीस ठाणी कार्यरत आहेत. यातील नवघर पोलीस ठाणे सहा वर्षांपूर्वी, त्यानंतर उत्तन विभागासाठी सागरी पोलीस ठाणे आणि नयानगर पोलीस ठाणे अवघ्या दीड-दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आहे. त्याआधी शहर संरक्षणाचा सर्व भार भाईंदर, मीरा रोड आणि काशिमीरा पोलीस ठाण्यांवरच पडत होता. शहरात सहा पोलीस ठाणी असली तरी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्राची परिस्थिती वेगवेगळी आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वाराला लागूनच मीरा-भाईंदर शहर वसलेले असल्याने इथल्या गुन्हेगारीमध्ये आणि मुंबईच्या गुन्हेगारीत फारसा फरक नाही. मुंबईतून तडीपार झालेले अनेक गुन्हेगार मीरा-भाईंदरच्या आश्रयाला आलेले आहेत. या पाश्र्वभूमीवर येथील पोलीस यंत्रणा अद्ययावत असण्याची तातडीची गरज आहे. सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या जेमतेम साडेपाचशेच्या आसपास भरते. यातही सुट्टय़ा, आजारपण, पोलीस मुख्यालयातील सेवा, वेळोवेळी केले जाणारे विशेष बंदोबस्त यामुळे पोलीस ठाण्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे साडेतीनशेच्या आसपासच असते. आंतरराष्ट्रीय मानकानुसार एक लाखाच्या वस्तीसाठी २२० पोलिसांची आवश्यकता आहे, भारतात हे प्रमाण १३० आहे. मीरा-भाईंदरची लोकसंख्या सुमारे बारा लाख, त्यात दररोज बाहेरून येणाऱ्यांची संख्या दोन ते तीन लाख गृहीत धरली तर १५ लाखांच्या लोकसंख्येसाठी अवघे ५५० पोलीस कर्मचारी ही आकडेवारीच इथल्या परिस्थितीचे विवेचन करते. मीरा-भाईंदरचे संपूर्ण शहरीकरण झालेले असतानाही हा भाग आजही ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गतच येतो.

मध्यंतरी डहाणू, वसई ते मीरा रोड या संपूर्ण किनारपट्टी भागासाठी सागरी आयुक्तालय स्थापन करण्याची टूम निघाली होती; परंतु भौगोलिकदृष्टय़ा अंतर पाहता हे पूर्णपणे अव्यवहार्य होते. त्यानंतर मीरा भाईंदर ठाणे पोलीस आयुक्तालयाला जोडण्याची चर्चाही  जोरात होती; परंतु त्याचेही पुढे काहीच झाले नाही. वसई-विरार आणि मीरा भाईंदरच्या गुन्हेगारीचे स्वरूप जवळपास सारखेच आहे, त्यामुळे या दोन्ही शहरांचे स्वतंत्र आयुक्तालय करण्याच्या प्रस्तावदेखील पुढे आला आहे. परंतु या प्रस्तावाला स्थानिक पातळीवरून विरोध आहे. मीरा भाईंदरसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयच हवे अशी आग्रहाची मागणी राजकीय स्तरावरून करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही प्रस्तावांवर शासनदरबारी विचारमंथन सुरू आहे.

आयुक्तालयाचा तिढा सुटलेला नसतानाच आता भाईंदरसाठी आणखी एक उपअधीक्षक नेमण्यात आला आहे. सध्या संपूर्ण मीरा-भाईंदरच्या सहा पोलीस ठाण्यांसाठी एक उपअधीक्षक कार्यालय मीरा रोड येथे आहे. त्याचे विभाजन करून भाईंदर पूर्व, भाईंदर पश्चिम आणि उत्तन सागरी या तीन पोलीस ठाण्यांसाठी मिळून स्वतंत्र उपअधीक्षक पद निर्माण केले गेले आहे. नव्या नियुक्तीमुळे निव्वळ मीरा रोड उपअधीक्षक कार्यालयावरील कामाचा बोजा कमी होण्यापलीकडे काहीच फरक पडणार नाही. गरज आहे ती उपअधीक्षक पदासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्याला पुरेसे कर्मचारी संख्याबळ उपलब्ध करून देण्याची. आयुक्तालयाच्या स्थापनेनेच ही कमतरता भरून निघू शकते. आयुक्तालय स्थापनेमुळे पुरेसेकर्मचारी आणि अधिकारी, त्यांच्या गरजेइतका शस्त्रसाठा, वाहने, अत्याधुनिक यंत्रणा आपोआपच उपलब्ध होईल. अतिरिक्त वरिष्ठ अधिकारी नेमण्यापेक्षा येथील बदलत्या गुन्हेगारी स्वरूपाला याचीच अधिक गरज आहे.

कोणत्या क्षेत्रात काय स्थिती?

* भाईंदर पश्चिम पोलीस ठाणे हे सर्वात शांत पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. पूर्वीचा भाईंदर गाव आणि राई, मुर्धे, मोर्वा या गावांचा परिसर आणि भाईंदरमध्ये नव्याने विकसित होत असलेला काही परिसर असा भाग या पोलीस ठाण्यात येतो. चोरी, घरफोडी, घरगुती भांडणे आणि झोपडपट्टय़ांमधून उद्भवणारे वाद अशी येतील गुन्हेगारीचे स्वरूप आहे.

* थोडय़ाफार प्रमाणात भाईंदर पूर्व परिसरातदेखील भाईंदर पश्चिमसारखीच परिस्थिती आहे, मात्र या ठिकाणी औद्योगिक वसाहती मोठय़ा प्रमाणात असल्याने बाहेरून येणाऱ्या कामगारांच्या सोबत येणाऱ्या गुन्हेगारीचाही यात समावेश आहे.

* उत्तन सागरी पोलीस ठाण्यावर सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर या पोलीस ठाण्याची निर्मिती झाली असल्याने त्याच्या जबाबदारीतही वाढ होते. येथील चौक किनाऱ्यावरून देशविघातक शक्ती प्रवेश करण्याची शक्यता असल्याचेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद आहे. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसोबतच जमिनींचे वाद येथील मोठी डोकेदुखी आहे.

* मीरा रोड आणि नयानगर ही दोन पोलीस ठाणी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होणारी पोलीस ठाणी आहेत. हे दोन परिसर संपूर्णपणे नव्याने वसले आहेत. सर्व धर्माचे, जातींचे इतकेच नव्हेत तर परदेशी नायजेरियन नागरिक अशी मिश्र वस्ती या ठिकाणी आहे. भाडय़ाने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्यादेखील या ठिकाणी मोठी आहे. इमारत बांधकाम व्यवसायदेखील तेजीत असल्याने बांगलादेशींचा शोध घेण्याचे अतिरिक्त काम पोलिसांवर येऊन पडते.

* काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या महामार्गालगतच बीअर बार, ऑर्केस्ट्रा बार, लॉज याची संख्या मोठी आहे. बार आणि लॉजमधून होणारी आर्थिक उलाढाल, सोबत वेश्या व्यवसायासारखे अनैतिक व्यवहार यांमुळे गुन्हेगारीला आपसूकच निमंत्रण मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:09 am

Web Title: police fail to control crime in mira bhayandar
Next Stories
1 चर्चेतील चर्च : वसई किल्ल्यातील रत्न!
2 वसई किल्ल्यात संध्याकाळी ६नंतर प्रवेश बंद
3 वसाहतीचे ठाणे : शेजारस्नेह जपलेले टुमदार संकुल
Just Now!
X