मलनिस्सारण वाहिन्यांही तुटक्या; पोलीस कर्मचाऱ्यांची आयुक्तालयाकडे दाद

ठाणे : कर्तव्य बजावत असताना घराची चिंता नसावी यासाठी पोलिसांना सरकारकडून सेवेत असताना राहण्यासाठी घरे दिली जातात. त्यानुसार ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनाही १० वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे पोलीस आयुक्तालयासमोरच पाच गगनचुंबी टॉवर बांधून दिले होते. ही घरे प्रशस्त आहेत. २५० ते ३०० चौ. फुटांच्या सदनिकांमधून थेट ५०० चौ. फुटांच्या प्रशस्त घरात राहण्यास मिळणार असल्याने पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता हे टॉवर पोकळ वासा ठरू लागले आहे. या इमारतींच्या घरांमध्ये १२ महिने भिंतींत ओलावा येत असून स्वच्छतागृहांमधील छत गळू लागले आहेत. मलनिस्सारण वाहिन्या तुटत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि कुटुंबीय हैराण झाले असून दाद मागण्यासाठी पोलीस कुटुंबीयांनी थेट आयुक्तालयच गाठले.

ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरे मिळावी यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाशेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०११ मध्ये न्यू जरीमरी पोलीस टॉवर वसाहत नावाने पाच टॉवर बांधले. यातील आदित्य, अरुण, सूर्य या इमारतींमध्ये पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. तर, रवि आणि भास्कर या इमारतींमध्ये पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. सुमारे २५० कुटुंबीय या पाच टॉवरमध्ये वास्तव्यास आहेत. प्रत्येक मजल्यावर चार सदनिका असून ‘२ बीएचके’ आकाराची ही घरे बांधण्यात आली आहेत. पोलीस वसाहतींतील जुन्या इमारतींऐवजी नव्या कोऱ्या घरात राहण्यास मिळणार असल्याने अनेक पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय आनंदात होते. मात्र अवघ्या काही वर्षांमध्येच या इमारतींची दयनीय अवस्था आता समोर आली आहे. सर्वच घरांमध्ये भिंतींना गळती लागली आहे. अनेकदा स्वच्छतागृहातील प्लास्टरही खाली पडत असते. त्यामुळे स्वच्छतागृहात जाताना छताचे प्लास्टर अंगावर कोसळण्याची भीती रहिवाशांमध्ये आहे. पाचही इमारतीतींतील सर्वच घराच्या भिंतींना ओलावा निर्माण झाल्याने त्याचे पाणीही घरात साचत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी सांगितले. अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याविषयी कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे पोलीस पत्नींचे म्हणणे आहे. त्यामुळे लांबून दिसणाऱ्या नेटक्या इमारतींची अवस्था आतून दुरवस्थेची आहे.

विशेष म्हणजे या इमारतींमध्ये वास्तव्य केल्याबद्दल पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनातील मासिक ७ हजार ते ८ हजार रुपये कपात होत आहे. तसेच घरांच्या देखभालीचे ५००हून अधिक रुपये कापले जात आहेत. त्यामुळे वेतन कापूनही सुविधा मिळत नसल्याने कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मलनिस्सारण वाहिन्याही फुटल्या

इमारतीतील मलनिस्सारण वाहिन्याही फुटल्या आहेत. त्यामुळे अनेकदा पिण्याच्या पाण्यासोबत गढूळ पाणीही येत असल्याचा आरोप पोलीस पत्नींनी केला. सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष घालत नसल्याने या सर्व तक्रारीसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पोलिसांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण

या इमारतींना ठाणे महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ठरावीक वेळेतच पिण्याचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दररोज २०० रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे पाणी खरेदी करावे लागत असल्याचे एका पोलीस पत्नीने सांगितले.