डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांचे मत
समाजातील वाढते गुन्हे थांबवण्यासाठी आणि पोलिसांचे बळ वाढवण्यासाठी दक्ष अशा नागरिकांचा ‘पोलीस मित्र’ या संकल्पनेत समावेश करून घेण्यात येईल. पोलीस आणि जनता या दोघांमध्ये असणारी दरी यामुळे कमी करता येईल. भविष्यात हेच पोलीस मित्र पोलीस आणि लोकांमधील दुवा ठरतील, असे मत वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केले. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तकप्रेमींचे ठाणे या साहित्य महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी डॉ. सिंघल यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.
ठाण्यातील वाचनप्रेमींसाठी नवता बुक वर्ल्ड या प्रकाशन संस्थेने कोर्टनाका येथील टाऊनहॉल येथे ३१ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या ‘पुस्तकप्रेमींचे ठाणे – जल्लोश मराठी साहित्याचा’ या नऊ दिवसांच्या उपक्रमाची सांगता रविवारी सायंकाळी रामदास बिवलकर यांनी घेतलेल्या डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मुलाखतीने झाली. डॉ. सिंघल यांनी नुकत्याच लिहिलेल्या ‘कुशावर्ताचा कोतवाल’ या पुस्तकाबद्दल माहिती दिली. या पुस्तकाच्या निमित्ताने १२ वर्षांपूर्वीच्या कुंभमेळ्याच्या आठवणी जागवताना डॉ. सिंगल यांनी व्यवस्थापनाचे अनेक कंगोरे उलगडून सांगितले.