भादवड भागातील १३ इमारतींची पुनर्रचना व नूतनीकरण

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी राज्य सरकारने भिवंडीतील भादवड भागात उभारलेल्या पोलीस वसाहतीतील घरांच्या कमी आकाराबद्दल होत असलेल्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर या वसाहतीतील १३ इमारतींची पुनर्रचना व नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वसाहतीच्या नूतनीकरणासाठी आठ कोटी ६९ लाखांचा निधी देण्यात आला असल्याने या ठिकाणी पोलिसांना आता मोठी घरे उपलब्ध होणार आहेत. यासोबतच गृह विभागाने ठाण्यातील जरीमरी पोलीस वसाहतीत दोन लाख लिटर क्षमतेचे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे येथील खारकर आळी भागातील जुन्या पोलीस वसाहती पाडून त्या जागी काही वर्षांपूर्वी पाच टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ ठाणे पोलिसांनी भिवंडीमधील पोलीस वसाहतीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भादवड भागातील १३ इमारतींची पुनर्रचना आणि नूतनीकरण करण्यात येणार असून या कामासाठी राज्य शासनाने आठ कोटी ६९ लाखांचा निधी नुकताच मंजूर केला आहे.

भिवंडी येथील भादवड परिसरात ठाणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची वसाहत असून त्या ठिकाणी चार ते पाच मजली एकूण १३ इमारती आहेत. १९८३ मध्ये उभारण्यात आलेल्या या वसाहतीमध्ये ३२० चौरस फुटांची घरे आहेत. या वसाहतीत एकूण ५२० घरे आहेत. अतिशय जीर्णावस्था झालेल्या या इमारतींच्या दुरुस्तीची मागणी कित्येक दिवसांपासून होती. त्यासोबतच या घरांचे क्षेत्रफळ कमी असल्याने दुरुस्ती करताना दोन घरांचे मिळून एक घर करण्याची मागणीही पोलीस कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. या इमारतींच्या दुरुस्तीकरिता भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यानुसार भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वच इमारतींची पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव केला होता. त्याला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून निधीही देण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार प्रत्येकी ३२० चौरस फुटांच्या दोन खोल्या एक करून त्याचे एक घर बनवण्यात येणार आहे.

घरांची संख्या निम्म्यावर

भिवंडी येथील भादवड भागातील पोलीस वसाहतीमध्ये ३२० चौरस फुटांची ५२० घरे आहेत. ही घरे लहान असल्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी येथे वास्तव्य करण्यास तयार होत नाहीत. तर अनेक कर्मचाऱ्यांनी मोठय़ा कुटुंबामुळे दोन घरे घेतली आहेत. या पाश्र्वभूमीवर नूतनीकरणानंतर पोलिसांना आता मोठी घरे उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्याचवेळी येथील एकूण घरांची संख्या २६० इतकी होईल, अशी माहिती भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन भोये यांनी दिली.

मलनि:सारण प्रकल्प

ठाणे येथील जरीमरी पोलीस वसाहतीमध्ये आरबीसी तंत्रज्ञानावर आधारित दोन लाख लिटर प्रति दिन क्षमतेचा मलनि:सारण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविलेल्या या प्रस्तावास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्पासाठी एक कोटी ४३ लाख १५ हजारांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या प्रकल्पामध्ये पोलीस वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा विविध कामांसाठी पुनर्वापर केला जाणार आहे.