कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाने तक्रारीतील नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे लाखाची लाच मागितल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यासंबंधी तक्रारदाराने यासंबंधीच्या चर्चेची एक चित्रफीत तयार केली आहे. ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे कल्याणचे प्रभारी पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मदन दराडे यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा  दाखल झाला आहे. त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर सुटले आहेत. हे प्रकरण न्यायप्रवीष्ट आहे. याच प्रकरणात पुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.घाडगे यांनी आपल्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली, असे दराडे यांनी सांगितले. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दराडे यांनी घाडगे यांनी लाच मागणे आणि त्या संबंधीची चित्रफीत प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना आपण असा कोणताही प्रकार केला नसून आपली प्रतिमा बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे असे सांगून झालेले सर्व आरोप फेटाळले आहेत.