डोंबिवली : कल्याण- शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीकर नोकरदारांनी माणकोलीमार्गे जलवाहतुकीचा पर्याय निवडला आहे. मात्र या प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या साधनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने डोंबिवली पोलिसांनी आता या जलवाहतुकीची चौकशी सुरू केली आहे.

समुद्र आणि खाडीत प्रवासी किंवा मासेमारी बोट चालवायची असेल तर त्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, अबकारी विभाग, स्थानिक पोलीस ठाणे, महसूल विभागाकडून परवानग्या दिल्या जातात. कल्याण, भिवंडी, डोंबिवली परिसरातील बहुतांशी बोटींना मासेमारीसाठी परवानगी आहे. काही बोट चालकांकडे प्रवासी वाहतुकीचे परवाने आहेत. ते पूर्ण क्षमतेने बोटीत प्रवासी मिळत नसल्याने त्या बोटी चालवत नसल्याचे समजते.

रेल्वे प्रवासास बंदी आणि वाहतूक कोंडी यांमुळे वैतागलेले अनेक नोकरदार जीव धोक्यात घालून आता बोटीने प्रवास करत आहेत. अनेक प्रवासी डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर खाडीकिनारी येऊन तेथून बोटीने माणकोली-वेहळे प्रवास करत आहेत. त्यानंतर हे नागरिक वेहळे येथून मिळेल त्या वाहनाने रस्ते मार्गे ठाण्याला जातात. मात्र बोटीमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने करोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच बोटीतून प्रवास करताना सुरक्षा जॅकेट, टायर आणि करोना संसर्गाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून प्रवासी बसतात का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे या वाहतुकीबाबत पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. याबाबत तहसीलदार दीपक आकडे आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या ठाणे कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

रेतीबंदर खाडीतून प्रवासी वाहतूक होत असल्याचे समजले आहे.  बोटीतून जलवाहतूक करताना सुरक्षेची, करोना संसर्गाची काळजी घेतली जाते का, बोटीतून प्रवासी वाहतुकीसाठी अत्यावश्यक शासन संस्थांच्या परवानग्या आहेत का याची तपासणी केली जाणार आहे.

राजेंद्र मुणगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णूनगर पोलीस ठाणे