कार्यक्रमांची माहिती देण्याचे सुजाण नागरिकांना आवाहन

अंबरनाथ : करोनाच्या संकटात गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. मात्र गणेशोत्सवाचा इतिहास पाहता छुप्या पद्धतीने होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली असून संकुलात छुप्या पद्धतीने गरबा खेळणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. त्यासाठी परिमंडळ चारच्या पोलिसांनी पथके तयार केली असून सुजाण नागरिकांना अशा कार्यक्रमांची माहिती देण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवात करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने अनेक निर्बंध लादले होते. त्यानंतरही अनेक ठिकाणी अंतर सोवळ्याचे नियम डावलून नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले होते. येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवातही अशाच प्रकारे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची भीती व्यक्त होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गृहसंकुलांच्या आवारातील गरब्याला बंदी आहे. त्यामुळे गृहसंकुलात करोनाचे निर्देश तोडत गरब्याचे आयोजन केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा साहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी दिला आहे. तसेच डीजे, बँड पथके आणि ढोल पथकांनाही याबाबत बजावण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. सुजाण नागरिकांनी असे छुपे कार्यक्रम रोखण्यासाठी पोलिसांना अशा कार्यक्रमांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.