नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांचे खास मोबाइल अॅप्लिकेशन
अवघ्या जगाशी संपर्काचे माध्यम ठरलेला स्मार्टफोन आता नागरिकांच्या सुरक्षेतही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मीरा-भाईंदरमधील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी थेट संपर्क साधता यावा, याकरिता पोलिसांनी ‘फर्स्ट इमर्जन्सी रिस्पॉन्स’ अर्थात ‘एफआयआर’ हे मोबाइल अॅप सुरू केले आहे. या अॅपवरील एका ‘क्लिक’नीशी नागरिकांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदत मिळवता येत आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत ५० हजार जणांनी हे अॅप डाउनलोड केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी एम्पायर ईटेक सोल्युशन्सच्या मदतीेने हे अॅप तयार केले आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अॅपचा शुभारंभ करण्यात आला होता. एखादी व्यक्ती संकटात असली तर मदतीसाठी या अॅपमधील कळ दाबताच नियंत्रण कक्षात त्याची माहितीे पोहोचते आणि त्या व्यक्तीचा ठावठिकाणा (लोकेशन) पोलिसांना समजते. त्याला तात्काळ जवळच्या पोलीस चौकी, बीट मार्शलला सांगून मदत पोहोचवता येते. पहिल्या चार दिवसातच ५० हजार जणांनी हे अॅप डाऊन लोड केले तर त्यातीेल ९० टक्के लोकांनी त्याचे ट्रायल बटण दाबले होते. हे अॅप मीरा भाईंदर शहरापुरतेच मर्यादित असल्याचीे माहिती मीरा रोड विभागाचे उपविभागीेय अधिकारी सुहास बावचे यांनी दिलीे. तसेच आतापर्यंत ४ लाख लोकांनी अॅपचा व्हिडीयो पाहिल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा अॅप सुरू झाल्यापासून दोन प्रकरणात वेळीच मदत पोहोचवण्यात पोलिसांना यश आल्याचे बावचे यांनी सांगितले. एका तरुणाकडून वारंवार त्रास होत असलेल्या एका तरुणीने या अॅपच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले, असे ते म्हणाले. या अॅपचा सर्वाधिक फायदा महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणार असल्याचे ते म्हणाले. या अॅपवरून साधल्या जाणाऱ्या संपर्कावर देखरेख ठेवण्यासाठी मीरा रोडच्या नियंत्रण कक्षात दहा कर्मचाऱ्यांची खास नियुक्ती करण्यात आली आहे.

असे वापरावे एफआयआर अॅप
’ हे अॅप अॅड्रॉइडवर आधारित स्मार्टफोनच्या गुगल प्ले स्टोरवर विनामूल्य उपलब्ध आहे.
’नाव, दोन संपर्क क्रमांक, ई-मेल आणि पत्ता नोंदवल्यानंतर हे अॅप सुरू होते.
’हे अॅप डाउनलोड करणाऱ्या वापरकर्त्यांची माहिती मीरा रोड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कक्षातील यंत्रणेत नोंदवली जाते.
’त्यानंतर या अॅपवरून एक क्लिक करताच संबंधित व्यक्ती कुठे आहे, याची पोलिसांना माहिती मिळते. त्यानुसार लगेच मदत पाठवता येते.
’हे अॅप मीरा-भाईंदर शहरापुरते मर्यादित आहे. मात्र, देशभरातून अनेकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. त्यामुळे यातील कोणी मदतीसाठी संपर्क साधल्यास मीरा रोडमधील नियंत्रण कक्षातून ती व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्याला माहिती दिली जाते.