ठाणे जिल्ह्य़ातील ४७हून अधिक शाळा-महाविद्यालयांचा सहभाग
भावी पिढीला वाहतूक नियमांविषयी माहिती व्हावी आणि त्यांचे त्यांच्याकडून पालन व्हावे या उद्देशाने ठाणे वाहतूक पोलिसांनी आता ‘सुरक्षित वाहन चालविणे’ याबाबत जागृती घडवण्यासाठी चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सुमारे ४७ हून अधिक महाविद्यालये तसेच शाळांना सहभागी करून घेण्यात येणार असून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्वच शहरांमध्ये ही चळवळ राबविण्यात येणार आहे. याशिवाय समाजमाध्यमांचीही या कामी मदत घेतली जाणार आहे. तसेच या चळवळीकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धामधील विजेत्या युवक तसेच युवतींसाठी महिंद्रा कंपनीची दुचाकी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांच्या घटना घडत असून अशा अपघातांमागे दुचाकी चालविताना गाणी ऐकणे, मोबाइलवर बोलणे अशी कारणे असतात. तसेच रस्त्यावरील अपघातांमध्ये सुमारे १४ ते ४० वयोगटातील तरुणाई मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठे असल्याचे देशातील अपघातांच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि तरुणांनाही अपघातामध्ये प्राण गमवावे लागू नये यासाठी विविध स्तरांवर जनजागृती अभियान राबविण्यात येते. याचा एक भाग म्हणून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सुरक्षित वाहन चालविणे’ अशी चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला, पथनाटय़ आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेकरिता सोशल मीडियाचा आधार घेण्यात येणार असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे विषय सोशल मीडियावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील लाइक्सवरही विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार असून त्यातूनच विजेत्यांची निवड केली जाणार आहे, असे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले.

भरघोस बक्षिसे..
’ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधील सुमारे ४७ हून अधिक महाविद्यालयांतील विद्यार्थी स्पर्धेत भाग घेणार आहेत.
’या स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाहतूक नियमांविषयी माहिती पोहोचविणे शक्य होणार आहे.
’ विजेत्या स्पर्धकांना महिंद्रा कंपनीची दुचाकी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.
’तरुण व तरुणी अशा दोन्ही गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे असतील.
’ शाळांमध्ये अशा स्वरूपाची स्पर्धा घेण्यात येणार असून त्यातील विजेत्यांना टॅब बक्षीस देण्यात येणार आहे.
’वाहतूक नियमांचा प्रसार करणाऱ्या प्राध्यापकांनाही बक्षिसे देणार
अनेकदा युवक-युवती वाहन चालविण्याचे प्रशिक्षण कुटुंबातील व्यक्ती किंवा नातेवाईकांकडून घेतात. हे प्रशिक्षण शास्त्रोक्त नसल्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात. तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळेही अपघात होतात. त्यामुळे युवक-युवतींमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठीच ठाणे ते बदलापूपर्यंतच्या महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा घेऊन ही चळवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
– डॉ. रश्मी करंदीकर,
वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त