ठाणे : येथील वागळे इस्टेटमधील रामनगर भागात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि पोलीस हवालदार आनंदा भिलारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रामनगर येथील रोड नं. २८ भागात नवनाथ धांडगे राहत होता. २०१५ मध्ये एका खुनाच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.  ठाणे मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता. २ एप्रिलला त्याला दीड महिन्यांसाठी संचित रजेवर सोडून देण्यात आले होते.

नवनाथने १७ मे या दिवशी कारागृहात हजर होणे अपक्षित होते. मात्र, तो हजर झाला नव्हता. अखेर  कारागृह प्रशासनाने फरार झाल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, नवनाथ हा रामनगर येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकला मिळाली होती. त्याआधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पहाटे उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. दत्तात्रय सरक आणि आनंदा भिलारे हे आरोपीला ताब्यात घेत असतानाच त्याने या दोघांवर कोयत्याने   हल्ला केला.  घटनेत आनंदा यांच्या पायाला आणि मनगटाला गंभीर जखम झाली. तर सरक यांच्याही पायाला मार लागला.  त्यानंतरही त्यांनी नवनाथला पकडले. याप्रकरणी नवनाथविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.