महाराष्ट्रातील संवेदनशील शहरांमध्ये भिवंडीची गणना होते. भूतकाळातील काही घटना त्यास कारणीभूत आहेत. गैरसमज व अफवा यामुळे दोन्ही समाजांत जातीय तेढ निर्माण होते आणि त्याचा फायदा घेत समाजविघातक प्रवृत्ती तरुणांची माथी भडकवितात. परिणामी, जातीय सलोखा बिघडतो व शहराला गालबोट लागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भिवंडी शहर ही बदनाम ओळख पुसून स्वत:ची नवी ओळख निर्माण करू पाहत आहे. नागरिक आणि पोलिसांनी एकत्र येऊन राबविल्या जात असलेल्या जनजागृती अभियानामुळे शहरात संवादाचे नवे पर्व तयार होत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्याशी नीलेश पानमंद  यांनी केलेली बातचीत..

*शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाताहेत?
भिवंडीत यापूर्वी अनुचित घटना घडल्याने या शहराकडे संवेदनशील नजरेतून पाहिले जाते. मात्र, गेल्या आठ महिन्यांत निवडणुका आणि उत्सव शांततेत पार पडले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लोकांच्या माध्यमातूनच जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.  याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे तीन भागांत वर्गीकरण करण्यात आले असून त्यानुसार त्यांची यादी करण्यात आली आहे. तसेच या नागरिकांना बँक आणि इतर कामांसाठी पोलिसांची मदत पुरविली जाते.
*लोकसहभाग कशा प्रकारे घेतला जातो?
दोन्ही समाजांतील जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये ‘कौमी एकता समिती’ कार्यरत असते. या समितीमध्ये दोन्ही समाजांतील नागरिक सदस्य असतात. एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याला गंभीर वळण लागणार नाही, याची काळजी समितीमार्फत घेतली जाते. याच समितीच्या माध्यमातून शहरात वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भिवंडी शहरात पूर्वी कार्यरत असलेल्या या समितीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामध्ये समाजात प्रभाव असणाऱ्या व्यक्ती, लोकप्रतिनिधी, मौलवी, पुजारी आदींना घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये तरुणांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नव्या समितीमध्ये १०५ सदस्य कार्यरत आहेत.
*लोकसहभागातून अभियान राबविण्यामागचा हेतू काय आहे?
पोलीस अधिकारी-कर्मचारी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असतात. पण समाजविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वच समाजांनी एकत्रित राहावे, एकमेकांमधील भाईचारा वाढावा आणि जातीय सलोखा कायम राहावा, हा यामागे उद्देश आहे.  
*जातीय सलोख्यापुरती ही समिती मर्यादित आहे का?
सर्वच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ‘कौमी एकता समिती’चे मुख्य काम जातीय सलोखा राखणे हेच असते. भिवंडीत मात्र पोलिसांमार्फत या समितीचे काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. जातीय सलोख्यासोबतच महिला व लहान मुलांवर अत्याचार होऊ नयेत म्हणून जनजागृती केली जाते. विशेषत: सोनसाखळी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी या मोहिमेचा विशेष फायदा झाला असून त्यामुळे भिवंडीत अशा स्वरूपाचे गुन्हे कमी होऊ लागले आहेत. त्याचबरोबर ‘नशामुक्ती अभियान’ही पोलीस आणि समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
*नशामुक्ती अभियान कशा प्रकारे राबविता?
गेल्या काही महिन्यांपूर्वी निजामपुरा पोलीस ठाण्यात एमडी पावडर विक्रीसंबंधी एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्य़ानंतर शहरात पोलीस आणि ‘कौमी एकता समिती’मार्फत नशामुक्ती अभियान राबविण्यात आले. या पावडरच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यामुळे या गुन्ह्य़ाव्यतिरिक्त एमडी पावडरचा एकही गुन्हा दाखल झालेला नसून चरस, गांजा अशा अमली पदार्थ सेवन आणि विक्रीच्या गुन्ह्य़ांना काहीसा आळा बसला आहे. भिवंडी शहरात मोठय़ा प्रमाणात कापड तयार करणाऱ्या लूम्स असून या ठिकाणी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि तेलंगाना आदी भागांतील कामगार मोठय़ा प्रमाणात काम करतात. या कापड उद्योगामुळे असलेल्या या कामगार वर्गाला विक्रेत्याकडून एमडी पावडर व्यसनाच्या जाळ्यात ओढण्याची शक्यता होती. याच पाश्र्वभूमीवर नशामुक्ती अभियान राबविण्यात आले आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.
*बेकायदेशीर रसायन ठेवणाऱ्या गोदामांवर काय कारवाई होते?
भिवंडीतील अंजुरफाटा ते मानकोली आणि अंजुरफाटा ते काल्हेर आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात गोदामे आहेत. अनेक गोदामांमध्ये बेकायदा रसायन तसेच इतर साहित्यांचा साठा करण्यात येतो. यामुळे अशा गोदामांची तपासणी करून त्याविरोधात कारवाई करण्यात येत असते. आतापर्यंत अशा गोदामांविरोधात कारवाई करून कोटय़वधीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी
two thief from kalyan ambernath arrested in housbreaking case
महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणारे कल्याण, अंबरनाथ मधील दोन अट्टल चोरटे अटकेत