जयेश शिरसाट

कोणाला संशय न येता चोरी करता यावी, मोठा हात मारता यावा यासाठी झारखंडहून मुंबईत आलेल्या दोन तरुणांनी तीन दिवस अहोरात्र गटारात वास्तव्य करून ड्रायफ्रूटच्या दुकानात पोहोचण्यासाठी भुयार खणलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी खोदलेलं भुयार दुकानात पाहोचलं.  त्यांनी चोरीही केली. पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. कल्पनेपेक्षा खुपच कमी पैसे त्यांच्या हाती लागले. म्हणून त्यांनी काही दिवसांनंतर आणखी एका दुकानात अशाचप्रकारे चोरी करण्याचा बेत आखला. गटारातलं वास्तव्य, भुयार यामुळे कोणाला संशय येणार नाही हा त्यांचा समज होता. प्रत्यक्षात भुयारामुळेच पोलीस त्यांच्या पर्यंत कमीत कमी वेळेत पाहोचू शकले.

प्रत्येक गुन्हा गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उदाहरणार्थ घरफोडी. घरफोडी म्हणजे बंद घराचा, कार्यालयाचा, दुकानाचा किंवा अन्य कोणत्याही आस्थापनेत शिरून चोरी करणं. दिवसाढवळ्या घरफोडी करणारे वेगळे आणि रात्रीच्या मिट्ट काळोखात असे गुन्हे करणाऱ्या टोळ्या वेगळ्या. दारावरचं कुलुप उचकटण्याच्या पद्धती भिन्न. पोलिसांच्या मोडस ऑपरेंडी ब्युरो म्हणजे गुन्हे करण्याच्या पद्धतीची नोंद करणाऱ्या विभागात सराईत गुन्हेगारांच्या पद्धती, हतखंडा याबाबत नोंदी होत असतात. अनुभवी पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचताच मनाने आरोपीपर्यंत पोहोचलेले असतात. ते या विभागातील नोंदी आणि अनुभवावरून. पायधुनी पोलिसांचं तपासचक्र असंच सुरू झालं.

पायधुनी परिसरात दिपेन डेढीया यांचं ड्रायफ्रूटचं दुकान आहे. २० मेला सकाळी कर्मचारी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. कुलुप उघडून आत येताच त्यांना सर्व वस्तू इतस्त: पसरलेल्या दिसल्या. दुकानात देढीया यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात जमीनत पडलेला खड्डाही दिसला. तिजोरी बंद होती पण ती उघडण्याचा प्रयत्न झाल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. गल्ला उघडा होता, पैसे आणि दुकानातील सुकामेवा बेपत्ता होता. कामगारांनी तात्काळ डेढीया यांना बोलावून घेतलं. पायधुनी पोलिसांनाही कळवण्यात आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लीलाधर पाटील, फडतरे आणि पथकाने तपास सुरू केला. घरफोडीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया एका बाजुला सुरू होती. पाटील आणि पथकाने दुकानाची, त्यात पडलेल्या खड्डयाची पाहाणी सुरू केली. चोर दुकानात शिरल्याच्या अन्य कुठेही खाणाखुणा दिसत नव्हत्या. दुकानाचं शटर जशासतसं होतं. त्यामुळे हा खड्डा नसून भुयार आहे जे रस्त्यावर किंवा शेजारील दुकानात बाहेर पडत असावं. एका व्यक्तीला या भुयारात उतरवून ते कुठे बाहेर पडतं याचा शोध घेण्यात आला. हे भुयार दुकानाजवळील एका गटारात उघडलं. भुयार खणून घरफोडी म्हणजे झारखंडच्या गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी, अनुभवी पोलीस पथकाने अंदाज बांधून तपासाचं केंद्र निश्चित केलं.

दुकानातील सीसीटीव्हींनी दोन्ही चोरटय़ांना कैद केलं होतं. पण त्यांचे चेहेरे अस्पष्ट होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत झारखंडहून आलेल्या आणि गुन्हेगारी पाश्र्वभुमी असलेल्यांची चौकशी सुरू झाली. खबऱ्यांना चोरटय़ांचं चित्रण दाखवण्यात आलं. पण ओळख पटत नव्हती. खबऱ्यांना कान-डोळे उघडे ठेवण्याच्या सूचना पथकाकडून मिळाल्या होत्या. झारखंड हा पैलू पकडून पोलिसांचा तपास सुरूच होता. अखेर आठवडय़ानंतर खबऱ्याने पायधुनीतच दोन चोरटयांपैकी एकाशी साम्य असलेला तरूण पाहिला. पाटील आणि पथकाने लागलीच हद्दीतल्या एका खानावळीत धाव घेतली. तिथे जेवण आटोपून निघालेल्या संशयीत तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली. त्याने गुन्हा कबूल केला. तसेच अन्य साथीदाराचा ठावठिकाणाही सांगितला.

आलम शेख, बादूस शेख अशी त्यांची ओळख. दोघे झारखंडचेच. बेरोजगार. मेहनत करून हळूहळू पायावर उभं राहावं याऐवजी चोरी करावी आणि झटपट श्रीमंत व्हावं, चैन करावी ही त्यांची इच्छा. तीच मनाशी धरत दोघे महिन्यापुर्वी मुंबईत आले. हातगाडी खेचण्याच्या बाहाण्याने पायधुनीतल्या बाजारपेठेत लक्ष्याचा शोध घेऊ लागले. डेढीया यांच्या दुकानात सततच्या गर्दीने त्यांचं लक्ष वेधलं. दुकानाची रचना, तिजोरी, रोजचा गल्ला, बंद होण्याची वेळ सगळी माहिती काढून १८ मे पासून काम सुरू केलं. दुकानासमोरील गटारात उतरून त्यांनी भुयार खणण्यास सुरूवात केली. या गटारात मल:निसारण वाहिनीही होती. कशाचीच पर्वा न करता तीन दिवस भुयार खणून हे दोघे दुकानात पोहोचले होते. आत जाताच त्यांनी तिजोरी फोडण्यास सुरूवात केली. डेढीया यांच्या दुकानाला लागून अन्य दुकाने असल्याने आणि तेथे जाग असल्याने फोडाफोडी अलगद करण्यावाचून दोघांकडे पर्याय नव्हता. भुयार खणण्यासाठी सोबत घेतलेल्या साहित्याने डेढीया यांची भली मोठी तिजोरी काही केल्या फुटत नव्हती. दोन तास अथक प्रयत्न करून तिजोरी उघडत नाही हे लक्षात येताच दोघांनी हार मानली. त्यांनी गल्ल्यातली चिल्लर, चांदीची नाणी आणि जमेल तेवढा सुकामेवा सोबत घेऊन याच भुयारी मार्गाने पळ काढला. सगळा मुद्दूमाल मिळून दोन लाखांच्या आसपास किंमत भरली. तिजोरी उघडली गेली असती तर कदाचित लाखो रुपये दोघांच्या हाती पडले असते. ते घेऊन दोघे त्याच दिवशी झारखंडला पसार झाले असते. पहिलाच गुन्हा असल्याने त्यांना पकडणं पोलिसांना अवघड झालं असतं. पण चोरीत अपेक्षित मुद्देमाल हाती न लागल्याने दोघे मुंबईतच थांबले. आठ दिवसांनी याच परिसरात आणखी एक भुयार खणून चोरी करण्याचा कट त्यांनी आखला होता.