जमिनीच्या व्यवहारातील पैसे देण्याचा तगादा लावणाऱ्या साथीदाराचा खून करून ती आत्महत्या असल्याचा भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी तपासकौशल्याच्या जोरावर त्यांचा हा कट उधळून लावला. तीन आरोपींपैकी दोघांना जेरबंद केले.

माणगाव तालुक्यातील अडघर गावाजवळ रेल्वे रुळावर मनोहर श्रीपत जुमारे यांचा मृतदेह आढळून आला. शरीरापासून विलग केलेले शीर अशा अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाकडे पाहिल्यास रेल्वेगाडी अंगावरून गेल्याने सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिसत होते. त्यामुळे अपघात की आत्महत्या अशी चर्चा बघ्यांमध्ये सुरू झाली. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने काय झाले असावे, हे लगेच ओळखले. शीर आणि धड यांच्यातील अंतर पाहताच कुणीतरी मनोहर यांची हत्या करून त्याला आत्महत्या वा अपघात भासवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी मनोहर यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी सुरू केली. पाठोपाठ शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार भारतीय दंडसंहिता कलम ३०२, २०१, आणि ३४ याप्रमाणे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

गुन्ह्य़ाचे स्वरूप लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांनी तपासाची जबाबदारी स्वत:च स्वीकारली. मनोहर जुमारे यांचे कोणाशी वाद होते का या दृष्टीने तपास सुरू केला आणि हळूहळू गुन्ह्य़ाचे पैलू उलगडत गेले.

मनोहर जुमारे यांच्या मालकीच्या माणगाव तालुक्यातील एका जमिनीचा विक्री व्यवहार झाला होता. या व्यवहारात सदरची जमिनीची किंमत २७ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. या ठरलेल्या रकमेपैकी अर्धीच रक्कम त्यांना मिळाली होती. त्यामुळे जमीन व्यवहारातील उर्वरीत रक्कम लवकर मिळावी यासाठी मनोहर प्रयत्नशील होते. ज्या दोन व्यक्तींनी या व्यवहारात मध्यस्थी केली होती, त्यांच्याकडे ते पैशाची सातत्याने मागणी करत होते. याच मागणीसाठी १२ ऑक्टोबर २०१७ रोजी मनोहर जुमारे हे आपल्या साथीदारांकडे गेले होते. अरुण तुकाराम शिंदे, दत्ताराम सीताराम जुमारे, नामदेव गंगाराम जुमारे अशी या साथीदारांची नावे. मनोहर हे पैशासाठी वारंवार पिच्छा पुरवत असल्याचा या तिघांनाही प्रचंड राग होता. त्यामुळे त्यांनी मनोहर यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. मनोहरला रात्री बोलावून चौघेही बाहेर घेऊन गेले. चौघांनी एकत्र मद्यप्राशन केले. मनोहर हे बेसावध असल्याचे पाहून त्याच वेळी धारदार शस्त्राने गळा चिरून या तिघांनी त्यांची हत्या केली.

आपले कृत्य लपवण्यासाठी या तिघांनी या हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा बेत आखला. त्यासाठी मनोहर यांचा मृतदेह अडघरजवळील रेल्वेमार्गावर आणून टाकण्यात आला. रेल्वे अंगावरून गेल्याने शीर आणि धड विलग झाल्याचा भास त्यांनी निर्माण केला. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. मनोहरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारे अरुण तुकाराम शिंदे, दत्ताराम सीताराम जुमारे, नामदेव गंगाराम जुमारे यांना ताब्यात घेण्यात आले व चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली.

या हत्येच्या तपासात पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी, साहाय्यक पोलीस निरीक्षक सायगावकर, पोलीस उपनिरीक्षक वाटवे, यांच्यासह मंगेश धुपकरे, संतोष म्हात्रे, योगेश समेळ आणि निवेदिता धनावडे या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.