वसई : केवळ एका कागदाच्या तुकडय़ावरून नालासोपारा पोलिसांनी एका अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावला आहे. या प्रकरणी महिलेचा पती आणि मुलासह तिघांना अटक केली आहे. आर्थिक वादातून ही हत्या करण्यात आली होती.

नालासोपारा पश्चिमेच्या हनुमाननगर येथील निर्जन भागात पोलिसांना २१ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची ओळख पटली नव्हती. गळ्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी तिची ओळख पटू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. परंतु पोलिसांना तिच्या कपडय़ात एक कागदाचा तुकडा सापडला होता. त्यावर एक अस्पष्ट असा मोबाइल क्रमांक होता. पोलीस तो क्रमांकअसलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. कोपरखैरणेमधील एका कंपनीच्यामालकाचा हा क्रमांकहोता. परंतु तो या मृत महिलेला ओळखत नव्हता. माझ्याकडे काम मागायला अनेक जण येतात, त्यामुळे प्रत्येकाला मी ओळखत नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मग या महिलेचे छायाचित्र घेऊन कौपरखैरणे परिसर पालथा घातला. बऱ्याच चौकशीनंतर एका व्यक्तीने या महिलेला ओळखले आणि महिलेची ओळख सांगितली. कुसुम प्रजापती (४५) असे या महिलेचे नाव होते. ती नालासापोरा येथे रहात होती.

तिची ओळख पटल्यानंतर पोलिसांचे पुढचे काम सोपे झाले. त्यांनी तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. तिच्या पतीने मुलगा आणि भाच्याच्या मदतीने कुसुम प्रजापतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. तिच्या पतीने दुसरे लग्न केले होते. कुसुम ज्या घरात रहात होती, ते घर तिच्या पतीला हवे होते. त्यासाठी हत्येचे षडयंत्र रचण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांनी सांगितले.