बदलापुरात फलाट क्रमांक तीनवर नव्यानेच केलेल्या छोटय़ा प्रवेशद्वारावरून रेल्वे प्रवाशांना चालणे आता जिकिरीचे झाले असून या प्रवेशद्वारी दोन्ही बाजूस दुचाकी उभ्या राहत आहेत. त्यातील धक्कादायक बाब अशी की या दुचाकींवर पोलीस असे लिहिले असून आता पोलीसच या प्रवेशद्वारावरच दुचाकी लावून घाईत रेल्वे पकडणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अडवणूक करत असल्याचे दिसून येत आहे.बदलापूर शहरातून दिवसभरात हजारो रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकाचा वापर करीत आहेत. यासाठी प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी पाच ते सात ठिकाणांहून प्रवेशद्वारांची सुविधा आहे. मात्र, रेल्वे प्रवाशांची संख्या खूपच मोठी असल्याने रेल्वे रुळांच्या बाजूला भिंतींना भगदाडे पाडून, रेल्वे रुळात उडय़ा मारून फलाटांवर येत आहेत. अशी परिस्थिती असताना रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला असलेल्या फलाट क्रमांक तीनवर नव्याने झालेल्या छोटय़ा प्रवेशद्वारातच दोन्ही बाजूने दुचाकी उभ्या राहत असून यातील काही दुचाकींवर पोलीस लिहिलेले आहे. या दुचाकींमुळे सकाळचे वेळी अत्यंत घाईत लोकल ट्रेन पकडण्यास येणाऱ्या प्रवाशांना आधीच छोटे असणारे प्रवेशद्वार अडचणीचे ठरत आहे. त्यातच संध्याकाळी बदलापूर पूर्वेकडून स्थानकात जाणारे व नोकरीवरून घरी येणारे प्रवासी या दोघांच्या एकत्र येण्याने या प्रवेशद्वारात गर्दी होत आहे. चार महिन्यांपूर्वीही या प्रवेशद्वारी अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी माध्यमांनी यावर आवाज उठवला होता. त्यामुळे येथे काही काळ दुचाकी उभ्या करणे बंद झाले होते.
वाहतूक पोलिसांच्या
सूचनेला हरताळ
रेल्वे स्थानक परिसरात अवैधरीत्या दुचाकी उभ्या करून नयेत यासाठी स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवरील या प्रवेशद्वाराशेजारीच असलेल्या रेल्वे तिकीट घरावर अंबरनाथ वाहतूक उपशाखेने एक सूचना लावली असून या सूचनेनुसार रेल्वे स्थानक परिसरात अवैधरीत्या दुचाकी उभी केल्यास कारवाई करण्यात येईल. मात्र, या सूचनेला आता पोलिसांनीच आपल्या दुचाकी उभ्या करून या वाहतूक पोलिसांच्या सूचनेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.
पूर्व भागात
अवैधरीत्या दुचाकी पार्किंग
वाढत्या बदलापूरमुळे बदलापूर पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरात अनेक दुचाकी अवैधरीत्या उभ्या असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेने दुचाकीस्वारांच्या सोयीसाठी तीन छोटे वाहनतळही येथे सुरू केले आहेत. मात्र, त्यांना पुरून उरेल इतक्या दुचाकींची संख्या येथे असल्याने आता मोठय़ा आणि सक्षम वाहनतळाची अपेक्षा काही रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

रेल्वे स्थानक भागात व शहरात प्रमुख ठिकाणी वाहनांची संख्या वाढली असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहोत. त्यातून यावर निश्चित मार्ग काढण्यात येईल. तसेच वाहतूक पोलीस येथे अवैधरित्या उभ्या दुचाकींवर नेहमीच कारवाई करतात. सदर फलाट क्रमांक तीन जवळील दुचाकींवर आम्ही तात्काळ कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना दिले.
-सुरेश इंगोल, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक