मीरा रोडमध्ये अभिनव उपक्रम; पोलीस मित्रांना विशिष्ट ओळखपत्रेही

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांमधल्याच ‘पोलीस मित्रां’ची मदत घेतली. या पोलीस मित्रांनी आता सायकलवरून मीरा रोड येथील नयानगर परिसरात रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांची कमी संख्या, त्यात शहराचा वाढता पसारा आणि त्यामागून वाढणारी गुन्हेगारी यामुळे दररोजच्या गुन्ह्य़ावर नियंत्रण आणणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. सर्वसामान्य नागरिकांनीच साहाय्य केले, तर गुन्ह्य़ांची संख्या नियंत्रणात येऊ  शकते या विचारातूनच ‘पोलीस मित्र’ या संकल्पनेचा जन्म झाला. मीरा-भाईंदरमधील प्रत्येक पोलीस ठाण्यात असे पोलीस मित्र नियुक्त झाले आहेत. इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत मीरा रोड व नयानगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्य़ांचा आलेख चढत्या स्वरूपाचा आहे. यासाठीच नयानगर पोलीस ठाण्याने पोलीस मित्रांचा वापर मोठय़ा खुबीने करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नयानगर पोलीस ठाण्यात २७५ पोलीस मित्रांची नोंदणी करण्यात आली. या पोलीस मित्रांना पोलीस ठाण्याकडून ओळखपत्रेही देण्यात आली. या पोलीस मित्रांपैकी ज्यांच्याकडे स्वत:ची सायकल आहे, अशांना वेगळीच जबाबदारी दिली. हे पोलीस मित्र विशिष्ट असे लाल रंगाचे जॅकेट घालून रात्रभर सायकलवरून गस्त घालत आहेत. प्रत्येक पथकासोबत पोलीस कर्मचारीही देण्यात आले आहेत. दररोज रात्री १५ ते २० पोलीस मित्र स्वत:हून या कामासाठी पोलीस ठाण्यात हजर होतात. प्रत्येक पथकाला विभाग वाटून दिल्यानंतर त्यांची गस्त सुरू होते.